मोदींच्या बंगळुरू दौऱ्यापूर्वी सापडली स्फोटके एक संशयित ताब्यात, सखोल चौकशी सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळुरू दौऱ्यापूर्वी शहराच्या बाहेरील भागात जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
मोदींच्या बंगळुरू दौऱ्यापूर्वी सापडली स्फोटके  एक संशयित ताब्यात, सखोल चौकशी सुरू
मोदींच्या बंगळुरू दौऱ्यापूर्वी सापडली स्फोटके एक संशयित ताब्यात, सखोल चौकशी सुरूसंग्रहित छायाचित्र
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळुरू दौऱ्यापूर्वी शहराच्या बाहेरील भागात जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

पंतप्रधानांचा ताफा जाण्यापूर्वीच कांड्या शोधल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमाकडे जाणाऱ्या मार्गावर, कग्गलीपुरा भागातील थाथागुणी येथे पोलिसांना जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. एका पुलाजवळ आणि कंपाऊंडच्या भिंतीपाशी या जिलेटीन कांड्या टाकण्यात आल्या होत्या. पंतप्रधानांचा ताफा या मार्गावरून जाण्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणांनी या कांड्या शोधून काढल्या, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी माहिती न्यूज१८ ने प्रसिध्द केली आहे.

संशयिताने स्वतः केला फोन

या घटनेचा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे, संशयित आरोपीनेच स्वतः पोलिसांना फोनरून स्फोटाची धमकी दिली होती. रविवारी पहाटे कोरामंगला येथील एका व्यक्तीने स्थानिक पोलीस ठाण्यात फोन केला. ‘एचएएल विमानतळ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राजवळ स्फोट होऊ शकतात,’ असा इशारा त्याने दिला होता.या फोन कॉलमुळे पोलीस तातडीने कामाला लागले. एचएएल परिसरात काहीही संशयास्पद आढळले नाही, मात्र आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मार्गावर तपासणी केली असता प्रत्यक्ष जिलेटीन कांड्या हाती लागल्या. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फोन करणाऱ्या व्यक्तीला शोधून ताब्यात घेतले.

आरोपीचा पूर्वेतिहास आणि पोलिसांचा संशय

तपासादरम्यान समोर आले आहे की, यापूर्वीही अनेक व्हिआयपी दौऱ्यांच्या वेळी या व्यक्तीने अशाच प्रकारचे धमकीचे फोन केले होते. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कारण समोर आले होते, त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले होते. मात्र, यावेळी प्रकरण गंभीर आहे; कारण केवळ पोकळ धमकी नव्हती, तर प्रत्यक्ष स्फोटक साहित्य घटनास्थळी सापडले आहे.आरोपीकडे जिलेटीन कांड्या कुठून आल्या? त्याला हे साहित्य कोणी पुरवले? तो कोणाच्या सांगण्यावरून हे करत होता का? आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला विरोध करणाऱ्या लोकांशी त्याचा काही संबंध आहे का? अशा विविध प्रश्नांचा पोलीस आता सखोल तपास करत आहेत.

खोडसाळपणा की षडयंत्र याचा शोध सुरू

वरिष्ठ पोलीस उपायुक्त आणि इतर सुरक्षा यंत्रणा आरोपीसह त्याच्या पालकांचीही चौकशी करत आहेत. हा केवळ एका मानसिक रुग्णाचा खोडसाळपणा आहे की यामागे एखादे मोठे षडयंत्र आहे, याचा शोध सध्या घेतला जात आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने या घटनेला अतिशय गांभीर्याने घेतले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in