
आपली संरक्षण निर्यात गेल्या पाच वर्षांत आठ पटीने वाढली आहे. आपण जगभरातल्या ७५ हून जास्त देशांना आता संरक्षण सामग्री आणि उपकरणे निर्यात करत आहोत. भारताची संरक्षण निर्यात २०२१-२२ या वर्षात एक अब्ज ५९ कोटी अमेरिकी डॉलर्सपर्यंत म्हणजेच १३ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे आणि येणाऱ्या काळात पाच अब्ज डॉलर्स म्हणजेच चाळीस हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर परिषद आणि प्रदर्शन केंद्रात संरक्षण प्रदर्शन -२२चे उद्घाटन केले. त्यावेळी ते संबोधित होते. पंतप्रधानांनी भारताच्या दालनात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने डिझाइन केलेल्या स्वदेशी ट्रेनर (प्रशिक्षण देणारे) विमान एचटीटी-४०चे अनावरण केले. पंतप्रधानांनी कार्यक्रमादरम्यान, मिशन डेफस्पेसचा शुभारंभ केला आणि गुजरातमधील डीसा हवाई क्षेत्राची पायाभरणी केली.
फक्त भारतीय कंपन्यांचाच सहभाग आणि केवळ मेड इन इंडिया उपकरणे असलेला हा पहिलाच डिफेन्स एक्स्पो मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान आणि गुजरातचे सुपुत्र या नात्याने, पंतप्रधानांनी सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या या कार्यक्रमामध्ये प्रतिनिधींचे स्वागत केले.
फक्त भारतीय कंपन्याचाच सहभाग आणि केवळ मेड इन इंडिया उपकरणे असलेले हे पहिलेच संरक्षण प्रदर्शन आहे असे यंदाच्या संरक्षण प्रदर्शनाचे वेगळेपण अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सांगितले. प्रदर्शनात १३०० हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत. यात भारत संरक्षण उद्योग, भारतीय संरक्षण उद्योगाशी संबंधित काही संयुक्त उपक्रम, एमएसएमई आणि १०० हून अधिक स्टार्टअपचा समावेश आहे.
भारतीय लष्करानेसुद्धा भारतामध्येच तयार झालेले लष्करी साहित्य खरेदी करण्याचे ठरवले असून, अशा उपकरणांच्या दोन याद्या तयार केल्या आहेत. अशा १०१ वस्तूंची यादी आज आम्ही प्रसिद्ध करत आहोत. असे निर्णय सुद्धा आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य दाखवून देत असतात.
या यादीनंतर पुढे, संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या लष्करी साहित्याची आणखी ४११ उपकरणं, मेक इन इंडिया उपक्रमा अंतर्गतच तयार करण्यात येतील, निश्चित केलेल्या या ४११ उपकरणांची बाहेरून आयात केली जाणार नाही. हे प्रदर्शन एकाच नजरेत भारताची क्षमता आणि त्यात दडलेल्या संधींची झलक देते. यानिमित्ताने पहिल्यांदाच ४०० हून अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.