नववर्षात इस्रोकडून एक्स्पोसॅटचे प्रक्षेपण; कृष्णविवरे, न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संशोधनासाठी खास मोहीम

इस्रोने २०२३ या वर्षात चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करून दाखवली. त्या पाठोपाठ सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य-एल-१ यानाचे प्रक्षेपण करण्यात आले
नववर्षात इस्रोकडून एक्स्पोसॅटचे प्रक्षेपण; कृष्णविवरे, न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संशोधनासाठी खास मोहीम
PM

बंगळुरू : चांद्रयान आणि सौरमोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक्स्पोसॅट या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची योजना आखली आहे. या मोहिमेद्वारे कृष्णविवरे, न्यूट्रॉन ताऱ्यांचे संशोधन केले जाणार आहे. अशा प्रकारची ही भारताची पहिलीच आणि अमेरिकेनंतर जगातील दुसरी मोहीम ठरणार आहे.

इस्रोने २०२३ या वर्षात चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करून दाखवली. त्या पाठोपाठ सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य-एल-१ यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान १२५ दिवसांत १५ लाख किलोमीटरचे अंतर पार करून अंतराळातील लाग्रान्ज-१ बिंदूवर ६ जानेवारी २०२४ रोजी पोहोचणे अपेक्षित आहे. या दुहेरी यशानंतर इस्रोने १ जानेवारी २०२४ रोजी एक्स्पोसॅट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचे ठरवले आहे. १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पीएसएलव्ही सी-५८ या प्रक्षेपकाच्या मदतीने एक्पोसॅटचे प्रक्षेपण केले जाईल, असे इस्रोने जाहीर केले आहे.

हा उपग्रह पृथ्वीपासून ५०० ते ७०० कमी उंचीवरील कक्षेत स्थापित केला जाईल. त्याचा कार्यकाल पाच वर्षांचा असेल. त्याद्वारे अंतराळातील कृष्ण विवरे, न्यूट्रॉन तारे, सुपरनोव्हा स्फोटांचे अवशेष आदींचे संशोधन केले जाणार आहे. या उपग्रहाची निर्मिती रमण रिसर्च इन्स्टिट्यूट (आरआरआय) आणि यू. आर. राव सॅटेलाइट सेंटर (यूआरएससी) यांनी एकत्रितपणे केली आहे.

पोलरीमेट्रीत अग्रस्थान मिळवण्याचे स्वप्न

एक्स-रे पोलरीमीटर सॅटेलाइटचे एक्स्पोसॅट हे लघुरूप आहे. अशा प्रकारची भारताची ही पहिलीच मोहीम आहे. अमेरिकेच्या नासाने २०२१ साली इमेजिंग एक्स-रे पोलरीमेट्री एक्स्प्लोरर (आयएक्सपीई) नावाचा उपग्रह पाठवला होता. तो जगातील अशा प्रकारचा पहिला उपग्रह होता. भारताचा उपग्रह अशा प्रकारचा जगातील दुसरा उपग्रह ठरणार आहे. एक्स्पोसॅटची रचना क्ष किरणांच्या उगमांच्या पोलरायझेशनचा अभ्यास करण्यासाठी केली आहे. त्यातून भारत अंतराळातील पोलरीमेट्री शास्त्रात अग्रस्थानी पोहोचेल असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in