अतिरिक्त सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ; ८ जुलैपर्यंत भरता येणार अर्ज, ४३ हजार ४५० विद्यार्थ्यांनी भरले अर्ज

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटी परीक्षेचे अर्ज करण्यास ८ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
अतिरिक्त सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ; ८ जुलैपर्यंत भरता येणार अर्ज, ४३ हजार ४५० विद्यार्थ्यांनी भरले अर्ज

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटी परीक्षेचे अर्ज करण्यास ८ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत ४३ हजार ४५० विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सीईटी कक्षाकडून ही मुदतवाढ दिली आहे.

यंदा प्रथमच बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेबाबत माहिती नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी अतिरिक्त सीईटी परीक्षेची मागणी केली होती. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमांची अतिरिक्त सीईटी घेण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार सीईटी सेलने अतिरिक्त सीईटीसाठी २९ जून ते ३ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. या प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ३ जुलैपर्यंत ५३ हजार ६२१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. यापैकी ४३ हजार ४५० विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपला अर्ज निश्चित केला आहे. तर १० हजार १७१ विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम टप्प्यात आहेत. या विद्यार्थ्यांना अर्ज भरता यावा, यासाठी सीईटी सेलने ८ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २९ मे रोजी बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाची सीईटी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी ५६ हजार २४८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

logo
marathi.freepressjournal.in