‘इंडिगो’त प्रवाशावर उभ्याने प्रवासाची वेळ, चूक लक्षात येताच विमान माघारी परतले

खासगी बस, रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा प्रवासी सीट न मिळाल्याने उभ्याने प्रवास करतात. आता श्रीमंतांच्या हवाई सेवेतही असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
‘इंडिगो’त प्रवाशावर उभ्याने प्रवासाची वेळ, चूक लक्षात येताच विमान माघारी परतले
Published on

नवी दिल्ली : खासगी बस, रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा प्रवासी सीट न मिळाल्याने उभ्याने प्रवास करतात. आता श्रीमंतांच्या हवाई सेवेतही असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात एक प्रवासी जादा झाल्याने त्याला बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे या प्रवाशाने उभ्यानेच प्रवास सुरू केला.

इंडिगो एअरलाईन्सचे विमान मुंबई-वाराणसीदरम्यान उड्डाण करणार होते. त्याचवेळी विमान कर्मचाऱ्याला एक प्रवासी विमानात उभ्याने प्रवास करीत असल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्याने ही माहिती वैमानिकाला दिली. त्यामुळे ‘टेक ऑफ’ सुरू केलेले हे विमान पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळावर परतले. येथे सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. विमान कंपनीने सर्व प्रवाशांच्या केबिनमधील सामानाची तपासणी केली. विमान पूर्ण भरलेले असतानाही प्रवाशाला तिकीट दिले गेले होते.

या प्रकारामुळे आता विमान प्रवासालाही रेल्वे व बस सेवेतील गोंधळाची बाधा झाली की काय, असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. रेल्वेमध्ये व बसमध्ये प्रवाशांना बसायला जागा मिळाली नाही, तर ते बऱ्याचदा त्रास सहन करून आपले इच्छित स्थळ गाठण्याचा प्रयत्न करतात. तसाच प्रकार आता विमान प्रवासातही सुरू होणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कंपनीने व्यक्त केली दिलगिरी

इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान उड्डाणापूर्वी कंपनीला ही बाब लक्षात आली. त्यामुळे विमान कंपनीने त्या प्रवाशाला उतरवले. कंपनी आपल्या परिचलनातील प्रक्रिया अधिकाधिक निर्दोष करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबाबत कंपनीने दिलगिरी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in