
नवी दिल्ली : ‘एक तरफ है घरवाली, एक तरफ बाहरवाली’ असे म्हणत असतानाच, आता देशात पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढू लागल्यामुळे विवाहबाह्य संबंधांची प्रकरणेही वाढू लागली आहेत. फक्त मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू यांसारख्या शहरांऐवजी आता छोट्या-मोठ्या अन्य शहरांमध्येही विवाहबाह्य संबंध म्हणजेच ‘एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअर्स’ची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. तमिळनाडूतील कांचीपूरम शहर आता देशात ‘सर्वात जास्त विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या’ यादीत अग्रस्थानी असल्याचे ‘ॲशले मेडिसन’ या ग्लोबल डेटिंग साईटच्या अहवालातील निष्कर्षाद्वारे समोर आले आहे.
जगभरात डेटिंग प्लॅटफॉर्मसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘अॅशले मॅडिसन’ या डेटिंग साईटच्या एका सर्वेक्षणानुसार, २०२४मध्ये १७ व्या क्रमांकावर असणाऱ्या कांचीपूरमने मोठी मुसंडी घेत थेट अव्वल स्थान पटकावले आहे. कांचीपूरमने दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांनाही मागे टाकले आहे. ५३ टक्के विवाहित भारतीयांनी आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे कबूल केले आहे. लग्नात समाधान न मिळणे, भावनिक असंतुलन, जबरदस्तीचे लग्न, लैंगिक समस्या आणि तिसऱ्या व्यक्तीकडून मिळणारा मानसिक आधार ही विवाहबाह्य संबंध ठेवण्यामागील प्रमुख कारणे आहेत.
मध्य दिल्लीने सलग दुसऱ्यांदा भारतातील टॉप-२० शहरांमध्ये दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे. मध्य दिल्ली, दक्षिण-पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर-पश्चिम दिल्ली हे सहा जिल्हे अव्वल २० क्रमांकाच्या यादीत आहेत. तसेच दिल्लीच्या शेजारील गुरुग्राम, गाझियाबाद आणि नोएडा या जिल्ह्यांचाही समावेश अव्वल २० शहरांमध्ये आहे.
जयपूर (राजस्थान), रायगड (छत्तीसगड), कामरूप (आसाम), चंदिगड यांसारख्या शहरांनी यादीत स्थान मिळवून अनेक मोठ्या मेट्रो शहरांना मागे टाकले आहे. अॅपवर यूजर्संची दररोजची अॅक्टिव्हिटी, एंगेजमेंटबद्दल माहिती, याचे विश्लेषण करून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील एकही शहर टॉप-२०मध्ये नाही
राज्यातील नागरिकांसाठी सुखावह बाब म्हणजे, विवाहबाह्य संबंध ठेवण्यात महाराष्ट्रातील एकही शहर अव्वल-२० जणांमध्ये स्थान मिळवू शकलेले नाही. विविध भाषिक वास्तव्यास असलेल्या मुंबईसारख्या मोठ्या महानगराला या यादीत पहिल्या २० शहरांमध्ये स्थान मिळालेले नाही.