FACT CHECK: खरंच बाबरी मशिदीच्या जागेपासून तीन किमी अंतरावर बांधलंय राम मंदिर?

राम मंदिराच्या जागेवरून राजकारण सुरू असताना आता 'ऑल्ट न्यूज'ने याबाबत तथ्यतपासणी केली असून हा दावा...
FACT CHECK:  खरंच बाबरी मशिदीच्या जागेपासून तीन किमी अंतरावर बांधलंय राम मंदिर?

येत्या काही दिवसांत २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मात्र, गुगल मॅपचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानुसार, ज्या जागेवर बाबरी मशीद पाडण्यात आली आणि ज्या जागेवरून इतके वाद झाले त्या जागेवर राम मंदिर बांधले जात नसून त्यापासून 3 किलोमीटर दूर असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत.

कशी झाली सुरूवात?

सर्वप्रथम मनीष जेठवानी नावाच्या युजरने गुगल मॅपचा स्क्रीनशॉट ट्विट केला होता. त्यासोबत, ज्या ठिकाणी बाबरी मशीद पाडण्यात आली त्या ठिकाणी राम मंदिर बांधले जात नाही तर दुसऱ्या ठिकाणी बांधले जात आहे, असा दावा करण्यात आला. तो स्क्रीनशॉट लगेचच व्हायरल झाला. त्यानंतर विरोधीपक्षातील काही नेत्यांनी हाच धागा पकडत भाजपवर टीकेची झोड उठवली. त्यावरून आता जोरदार राजकारणालाही सुरूवात झाली आहे.

फॅक्ट चेक -

राम मंदिराच्या जागेवरून राजकारण सुरू असताना आता 'ऑल्ट न्यूज'ने याबाबत तथ्यतपासणी केली असून हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. गुगल मॅप, गुगल अर्थ प्रो आणि २०११ च्या सॅटेलाईट प्रतिमांच्या मदतीने व्हायरल स्क्रीनशॉटची पडताळणी करून स्क्रीनशॉटमध्ये 'सीता-राम बिरला मंदिर हे बाबरी मशिद दाखवून खोटा दावा करण्यात आला आहे. पण, प्रत्यक्षात ज्या ठिकाणी बाबरी मशीद पाडली गेली त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले जात आहे', असे 'ऑल्ट न्यूज'ने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर खोटा दावा व्हायरल झाला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in