इंडिया आघाडीत बिघाडी; ममतांचा ‘एकला चलो’चा नारा, बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेशात जागावाटपाचा तिढा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरुन वाद सुरू झाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
इंडिया आघाडीत बिघाडी; ममतांचा ‘एकला चलो’चा नारा, बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेशात जागावाटपाचा तिढा

नवी दिल्ली : गेल्या दोन निवडणुका जिंकून देशात सत्तेत आलेल्या भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार करत उघडण्यात आलेल्या २८ विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत बिघाडी सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरुन वाद सुरू झाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काँग्रेससोबत जागा वाटप करण्यात असमर्थता दर्शवली आहे. जागावाटपावरून पश्चिम बंगाल, पंजाब व उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी अडचणीत आल्यामुळे त्यांच्या भविष्याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इंडिया आघाडीला मोठा धक्का देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या आदल्या दिवशीच बॅनर्जी यांनी ही घोषणा केली असून यात्रेविषयी आपणास कुणी कल्पना दिली नव्हती अशी टिप्पणी देखील केली आहे. आपण जागावाटपाचा प्रस्ताव काँग्रेससमोर मांडला होता. पण त्यांनी तो नाकारला आहे. यामुळे आमच्या पक्षाने आता एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसची ही आर्श्चयकारक घोषणा ऐकल्याने काँग्रेस पक्ष सावध झाला आहे. ममता शिवाय इंडिया आघाडीचा कुणी विचारच करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. तृणमूल कॉंग्रेस हा इंडिया आघाडीचा महत्वाचा स्तंभ आहे, अशी टिप्पणी देखील रमेश यांनी केली आहे. सूत्रांकडील माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसला आगामी लोकसभेत केवळ दोन जागा देवू केल्या होत्या. कॉंग्रेसच्या २०१९ च्या निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे हा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र कॉंग्रेसने हा प्रस्ताव फेटाळला आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचा कॉंग्रेससोबत कोणाताही संबंध नसेल. कॉंग्रेसला देशभरात स्वतंत्रपणे ३०० जागा लढू द्याव्यात, अशी टिप्पणी देखील ममता यांनी केली आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे बंगालमधील प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी आपण जागांसाठी तृणमूल काँग्रेसकडे भीक मागणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली आहे. कॉंग्रेस आणि तृणमूल यांनी २००१ साली युती केली होती. यामुळेच ३४ वर्षांची डाव्यांची बंगालमधील मक्तेदारी नेस्तनाबूत झाली होती.

एकीकडे बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला असतांनाच पंजाबचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष कॉंग्रेससोबत जागावाटपासाठी युती करणार नाही. आम आदमी पक्ष पंजाबमधील सर्व १३ जागांवर निवडणूक लढवेल, असे मान यांनी बुधवारी जाहीर केले. इंडिया आघाडीतील २८ घटक पक्षांपैकी आप आणि तृणमूल हे महत्वाचे व राज्यात सत्ता असलेले पक्ष आहेत.

नितीश कुमार यांचाही सूर बदलला

बिहारचे ओबीसी नेते व माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल केंद्र सरकारची स्तुती करतांना नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. यावरुन त्यांचा सूर बदलल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे नितीश कुमार आणि एनडीए यांच्यात काही तरी शिजत आहे. भाजप नेते नितीश यांना एनडीएत घेण्याच्या बाजुने आहेत. मात्र एनडीएत आल्यानंतर ते मुख्यमंत्री राहतील याची शाश्वती देण्यास भाजप तयार नसल्यामुळे घोडे अडले असल्याचे बोलले जात आहे. एकंदर इंडिया आघाडीचा हा प्रमुख नेता देखील आता आघाडीतून गळण्याच्या मार्गावर आहे.

ते त्यांचे राजकीय धोरण - राष्ट्रवादी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा ही तृणमूल काँग्रेसच्यादृष्टीने राजकीय धोरणाचा भाग असू शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने व्यक्त केले आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष इंडिया आघाडीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते आमच्यासोबत आहेत आणि आम्ही भाजपच्या विरोधात जोरदार लढा देऊ. ममताजींनी विधान केले असेल, तर हा रणनीतीचा भाग असू शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी सांगितले. ते म्हणाले की, आदल्या दिवशी, बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, मी त्यांना काँग्रेसला जागावाटपाचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी तो सुरुवातीलाच नाकारला. आमच्या पक्षाने आता बंगालमध्ये एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ममतादीदींची लढत वाघिणीप्रमाणे - आदित्य

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वाघिणीप्रमाणे लढत असल्याचे सांगत त्यांची लढाई त्यांच्या राज्यासाठी महत्त्वाची आहे, असे मत शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केले. ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. या संबंधात आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, बॅनर्जींच्या निर्णयाबद्दल त्यांना माहिती नव्हती, मात्र त्या वाघिणीसारख्या लढत असून त्यांची लढाई त्यांच्या राज्यात खूप महत्त्वाची आहे.

ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात; डोक्याला दुखापत

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ममता बॅनर्जी राज्याच्या पूर्व आणि पश्चिम वर्धमान जिल्ह्यात पोहोचल्या होत्या. वर्धमानमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आटोपून ममता बॅनर्जी राज्याची राजधानी कोलकाता येथे परतत होत्या. ममता बॅनर्जी यांच्या गाड्याच्या ताफ्यात अन्य एक कार आल्याने चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचे डोके पुढील डॅशबोर्डला आदळले. ज्यामुळे त्यांच्या कपाळाला किरकोळ दुखापत झाली. नियोजित कार्यक्रमानुसार त्या हेलिकॉप्टरने परत येणार होत्या. पण खराब हवामानामुळे त्यांनी गाडीने प्रवास केला. गेल्या वर्षीही जूनमध्ये ममता बॅनर्जी अपघातात जखमी झाल्या होत्या. पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी जलपायगुडीतील निवडणूक रॅलीनंतर बागडोगरा विमानतळावर जात होत्या. यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानाच्या परिसरात बैकुंठपूरच्या जंगलाजवळ पोहोचले. यानंतर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि यादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या डाव्या गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली.

logo
marathi.freepressjournal.in