टीव्ही अँकरवर व्यावसायिक महिलेचं मन जडलं, लग्नासाठी त्याचं थेट अपहरणच केलं; हैदराबाद पोलिसांनी केली अटक

प्रणव हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून छंद म्हणून एका म्युझिक कंपनीत अँकरिंग करतो.
टीव्ही अँकरवर व्यावसायिक महिलेचं मन जडलं, लग्नासाठी त्याचं थेट अपहरणच केलं; हैदराबाद पोलिसांनी केली अटक

एकतर्फी प्रेम, अपहरण, फसवणूक...आणि बरेच काही. क्राईम थ्रिलरसारखी एक घटना हैदराबादमधून समोर आली आहे. एका व्यावसायिक महिलेचे मन टीव्ही अँकरवर जडले, म्हणून तिने त्याचे थेट अपहरणच केले. टीव्ही अँकर कसाबसा तिच्या तावडीतून निसटला आणि थेट पोलिस स्थानक गाठले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी बोगिरेड्डी तृष्णा (वय-31) हिला अटक केली आहे.

माहितीनुसार, बोगिरेड्डी तृष्णा ही पाच स्टार्टअप कंपन्यांची व्यवस्थापकीय संचालक आहे. ती डिजीटल मार्केटिंगचा व्यवसाय करते. दोन वर्षांपूर्वी एका वैवाहिक संकेतस्थळाच्या माध्यमातून तिची चैतन्य रेड्डी नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. पण, चैतन्यने त्याच्या प्रोफाईलवर अँकर प्रणव सिस्तला याचा फोटो ठेवला होता. चैतन्य हाच प्रणव असल्याचे तृष्णाला वाटले आणि तिचे मन त्याच्यावर जडले.

दोघांमधील संवाद जसजसा वाढला तसतसा त्यांनी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर चॅटिंग सुरू केले. त्यानंतर चैतन्यने तृष्णाला चांगल्या परताव्याचे आश्वासन देत त्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले. तिने यूपीआयच्या माध्यमातून चैतन्यला 40 लाख रुपये दिले होते. मात्र त्यानंतर चैतन्यने तिच्याशी संपर्क तोडला.

योगायोगाने तो नंबर प्रणवचाच निघाला

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तृष्णाने चैतन्यच्या प्रोफाईलवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला, जो टीव्ही अँकर प्रणवचाच निघाला. तुझ्या फोटोचा गैरवापर होत आहे असे तिने प्रणवला सांगितले. मग प्रणवने पोलिस ठाण्यात सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली. पण, या दरम्यान तृष्णा प्रणववर एकतर्फी प्रेम करू लागली. तिने त्याला लग्न करण्याची गळ घातली. मात्र, प्रणवने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तृष्णाने त्याला त्रास देण्यास सुरूवात केली. अखेर प्रणवने तिचा नंबर ब्लॉक केला.

हे सहन न झाल्याने तृष्णाने तिच्या ऑफिसमधील एका व्यक्तीला 50 हजार रुपये देऊन प्रणवचे अपहरण करण्यास सांगितले. प्रणवच्या कारवर ट्रॅकिंग डिव्हाइस एअर टॅगही लावले, जेणेकरून अँकरच्या हालचालीवर लक्ष ठेवता येईल. मग त्या व्यक्तीने अजून चार गुंडांना सोबत घेतले आणि 11 फेब्रुवारी रोजी प्रणवचे अपहरण केले आणि त्याला तिच्या कार्यालयातील एका खोलीत ठेवले. तिथे माझे कॉल उचलशील असे प्रणवकडून तिने वदवून घेतले. ते मान्य केल्यावरच प्रणवला सोडण्यात आले. तिथून सुटका होताच प्रणवने थेट उप्पल पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. त्यानंतर आता तृष्णासह पाचही अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तथापि, 40 लाख रुपयांच्या फसवणुकीचा कोणताही पुरावा अद्याप मिळाला नसल्याचे उप्पलच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रणव हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून छंद म्हणून एका म्युझिक कंपनीत अँकरिंग करतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in