अस्तित्वात नसलेल्या देशाचे उत्तर प्रदेशात दूतावास; ४४ लाख रुपये जप्त

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये काही लोकांनी मिळून बनावट दूतावास उभारला आहे. उत्तर प्रदेश ‘एसटीएफ’ने हे रॅकेट उघडकीस आणले आहे. ‘एसटीएफ’ने या प्रकरणात एका आरोपीला अटकही केली आहे.
अस्तित्वात नसलेल्या देशाचे उत्तर प्रदेशात दूतावास; ४४ लाख रुपये जप्त
Published on

गझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये काही लोकांनी मिळून बनावट दूतावास उभारला आहे. उत्तर प्रदेश ‘एसटीएफ’ने हे रॅकेट उघडकीस आणले आहे. ‘एसटीएफ’ने या प्रकरणात एका आरोपीला अटकही केली आहे. आरोपीचे नाव हर्षवर्धन जैन असे आहे. हर्षवर्धन गाझियाबादच्या कविनगरमध्ये भाड्याने घेतलेल्या घरात बेकायदेशीरपणे ‘वेस्ट आर्क्टिका’ या देशाचा दूतावास चालवत होता. दरम्यान, पोलीस तपासात असे समोर आले की, आरोपी स्वतःला वेस्ट आर्क्टिका, सबोरा, पॉलिया, लोडोनिया यासारख्या देशांचा राजदूत असल्याचे सांगत होता. याचबरोबर, राजनैतिक नंबर प्लेट असलेल्या वाहनांमधून प्रवास करीत होता. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, ही अशा देशांची नावे आहेत जी कुठेही अस्तित्वात नाहीत. लोकांना प्रभावित करण्यासाठी, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि इतर अनेक मान्यवरांसोबतचे मॉर्फ केलेले फोटो वापरले जात होते.

‘वेस्ट आर्क्टिका’ हा एकमेव देश नाही. जगभरात असे अनेक मायक्रोनेशन्स आहेत जे सार्वभौमत्वाचा दावा करतात, परंतु कोणत्याही देशाने त्यांना मान्यता दिलेली नाही. अमेरिकन नौदलातील अधिकारी ट्रॅव्हिस मॅकहेन्री यांनी २००१ मध्ये ‘वेस्ट आर्क्टिका’ची स्थापना केली आणि नंतर स्वतःला त्याचे ग्रँड ड्यूक म्हणून नियुक्त केले.

हवाला रॅकेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दूतावासाच्या नावाखाली आरोपी कंपन्या आणि इतर लोकांकडून इतर देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळत होते. पोलीस तपासात असे दिसून आले आहे की, टोळीतील सदस्य शेल कंपन्यांद्वारे हवाला रॅकेट चालवत होते. अटक करण्यात आलेला आरोपी हर्षवर्धन हा यापूर्वी चंद्रास्वामी आणि अदनान खगोशी (आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र विक्रेते) यांच्या संपर्कात असल्याचेही आढळून आले आहे. २०११ मध्ये हर्षवर्धनकडून एक बेकायदेशीर सॅटेलाइट फोनही जप्त करण्यात आला होता. याबाबत त्याच्यावर कविनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

logo
marathi.freepressjournal.in