नवी दिल्ली : शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांबरोबर गुरुवारी सायंकाळी केंद्र सरकारच्या तीन मंत्र्यांची बैठक होणार आहे. अर्जुन मुंडा, पीयूष गोयल आणि नित्यानंद राय हे तीन केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजितसिंग दल्लेवाल आणि पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वन सिंग पंढेर यांनी बुधवारी दिली.
केंद्रीय मंत्र्यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर होणारी गुरुवारची तिसरी बैठक असेल. यापूर्वीची बैठक चंदिगड येथे पार पडली होती. आधीच्या दोन बैठकांमध्ये तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या रोखाने कूच केले होते. आता तिसऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घाईगडबडीत कायदा केला जाणार नाही. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा सोडून वाटाघाटींचा सनदशीर मार्ग अवलंबावा, असे आवाहन सरकारने केले आहे.
दरम्यान, बुधवारी दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांबरोबर पोलिसांची झटापट सुरूच होती. पंजाब हरियाणातून ट्रॅक्टर आणि ट्रॉलींमध्ये अनेक दिवसांचा शिधा आणि इंधन भरून हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. त्यांना राजधानीत घुसण्यापासून मज्जाव करम्यासाठी सुरक्षादलांनी दिल्लीच्या वेशीवर जोरदार मोर्चेबंदी केली आहे. काटेरी तारांचे कुंपण, सिमेंट काँक्रिटची तटबंदी, रस्त्यांवर पेरलेल लोखंडी खिळे, बॅरिकेड्स आणि लाठी, बंदुकांसह अश्रुधुराची नळकांडी आणि पाण्याचे फवारे, अशी जय्यत तयारी केली आहे. हरियाणाच्या पोलिसांनी पंजाबच्या हद्दीत आंदोलकांना पिटाळण्यासाठी ड्रोनद्वारे अश्रुधुराचे गोळे टाकले. त्याचा पंजाबच्या अधिकाऱ्यांनी निषेध केला आहे. सुरक्षादलांच्या शस्त्रांना उत्तर देण्यासाठी आंदोलक नवनवीन क्लृप्त्यांची योजना करत आहेत. हवेतील ड्रोनला अडथळा निर्माण करण्यासाठी शेतकरी पतंग उडवत आहेत.
भारतात प्रथमच साऊंड वेपन्सचा वापर
दिल्लीतील आंदोलकांना पांगवण्यासाठी सरकारने प्रथमच साऊंड वेपन्स किंवा ध्वनी अस्त्रांचा वापर केला आहे. हा नॉन-लिथल किंवा डायरेक्टेड एनर्जी वेपन्सचा एक प्रकार आहे. दिल्ली पोलिसांनी वापरलेल्या उपकरणांना लाँग रेज अकॉस्टिक डिव्हायसेस (एलआरएडीएस) म्हणतात. त्यातून आंदोलकांवर इन्फ्रासाऊंडचा वापर केला जातो. मानवी कानांमध्ये ठराविक तरंगलांबीच्या आवाजाचेच श्रवण करण्याची क्षमता आहे. त्या पलिकडे इन्फ्रा आणि अल्ट्रासाऊंड असतो. या प्रकारचा आवाज मानवी कानांना ऐकू येत नाही. तो ध्वनी असल्याने दिसत नाही. पण त्याचा परिणाम शरीरावर जाणवतो. या प्रकारचा आवाज विशिष्ट उपकरणांतून आंदोलकांवर सोडला जातो. त्याने आंदोलकांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू होतो. आवाजाची तीव्रता जास्त असल्यास कानांचे पडदेही फाटू शकतात.