अंबाला : पंजाब-हरयाणाच्या शंभू-खनौरी सीमेवर ठाण मांडून असलेले आंदोलक शेतकरी ६ मार्चला दिल्लीकडे कूच करणार असून १० मार्चला दुपारी १२ ते ४ या वेळेत ‘रेल रोको’ करणार आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. भटिंडा येथे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर व जगजितसिंग दालेवाल यांनी ही घोषणा केली.
हरयाणा-पंजाबमधील शेतकरी खनौरी-शंभू सीमेवरच आंदोलन करतील, तर देशाच्या उर्वरित भागातील शेतकरी ६ मार्चला आपापल्या मार्गाने दिल्लीत पोहोचतील. आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही आंदोलनात ड्रोनचा वापर झालेला नाही. सरकारने ड्रोनचा वापर करून बाहेरून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सरकारने हरयाणा-पंजाबची सीमा पाकिस्तान आणि चीनच्या सीमेसारखी केली आहे. त्या सीमांवर तारा लावलेल्या आहेत, पण सरकारने पंजाब-हरयाणा सीमेवर फक्त भिंती उभ्या केल्या आहेत. भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवरही कायदे आहेत, पण हरयाणा-पंजाब सीमेवर कायदा नाही. केंद्र सरकारने ७० हजार सैन्याचा यासाठी वापर केला, असा आरोप शेतकरी नेते पंढेर यांनी केला आहे.