पंजाब बंद: शेतकरी आक्रमक; रेल्वे, रस्ते वाहतूकीसह विमान सेवेवरही परिणाम

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘पंजाब बंद’चा परिणाम सोमवारी पंजाबमधील दैनंदिन जनजीवनावर झाला.
पंजाब बंद: शेतकरी आक्रमक; रेल्वे, रस्ते वाहतूकीसह विमान सेवेवरही परिणाम
एक्स @karamprakash6
Published on

चंदिगड : आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘पंजाब बंद’चा परिणाम सोमवारी पंजाबमधील दैनंदिन जनजीवनावर झाला. बंदच्या आवाहनानंतर राज्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ते बंद केले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. केंद्र सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्याने संयुक्त किसान मोर्चाने (बिगर राजकीय) गेल्या आठवड्यात या बंदची घोषणा केली होती. संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार सोमवारी सकाळी ७ वाजता बंद सुरू झाला. धारेरी जट्टन टोल प्लाझा येथे शेतकऱ्यांनी धरणे दिल्याने पतियाळा चंदिगड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अमृतसरच्या गोल्डन गेटवर शेतकरी गोळा होऊ लागले होते, तर भटिंडा येथील रामपुरा फूल येथेही रस्ते बंद करण्यात आले होते.

शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले असून, संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली ‘पंजाब बंद’ची हाक देण्यात आली. पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या बंदमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या आंदोलनामुळे २२१ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. तसेच रस्ते वाहतूक आणि विमान सेवेवरही बंदचा परिणाम झाला आहे.

डल्लेवाल यांच्या उपोषणाचा ३५ वा दिवस

शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या आमरण उपोषणाचा आज ३५ वा दिवस आहे. डल्लेवाल यांनी आतापर्यंत वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. पिकांना किमान हमीभाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलक पंजाब-हरयाणाच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, असा इशारा डल्लेवाल यांनी आधीच दिलेला आहे.

‘एमएसपी’बरोबरच शेतकरी कर्जमाफी, पेन्शन, विजेच्या दरामध्ये वाढ होऊ नये, पोलिसांकडून दाखल खटले मागे घ्यावेत आणि २०२१ मध्ये लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय मिळावा, या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. दिल्लीमध्ये प्रवेश करण्यास रोखण्यात आल्यापासून संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि शेतकरी मजदूर मोर्चा यांनी पंजाब आणि हरयाणामधील शंभू, खनौरी बॉर्डर येथे तळ ठोकला आहे. ६ ते १४ डिसेंबरदरम्यान १०१ शेतकऱ्यांच्या एका समूहाने तीन वेळा दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हरणायाच्या सुरक्षा दलांनी त्यांना रोखले होते.

शेतकऱ्यांनी महामार्ग रोखले

पंजाबमध्ये २०० ठिकाणी रस्ते रोखण्यात आले. जालंधर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग आणि अमृतसर-दिल्ली महामार्गावर शेतकरी ठाण मांडून बसले होते. मोहालीत विमानतळ रस्ता रोखण्यात आला. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे ६०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रेल्वेसेवेवर परिणाम झाला असून १५ गाड्या उशिराने धावत आहेत, तर नऊ गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशा ठिकाणी या गाड्या थांबवल्या जात आहेत.

शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी रविवारी सांगितले की, सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा बंद सुरू राहील. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. विमान प्रवासासाठी विमानतळावर जाणारे प्रवासी, नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जाणारे आणि विवाहात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्यांना बंदमधून सवलत दिली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in