शेतकऱ्यांचा मोर्चा दिवसासाठी स्थगित; अश्रुधुराच्या माऱ्यात शेतकरी जखमी
एक्स

शेतकऱ्यांचा मोर्चा दिवसासाठी स्थगित; अश्रुधुराच्या माऱ्यात शेतकरी जखमी

आपल्या विविध मागण्या धसास लावण्यासाठी दिल्लीकडे पायी कूच करणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी आपला मोर्चा एका दिवसासाठी स्थगित केला. सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्यामध्ये काही शेतकरी जखमी झाल्याने शुक्रवारी एका दिवसासाठी मोर्चा स्थगित करीत असल्याचे पंजाबमधील एका शेतकरी नेत्याने सांगितले.
Published on

शंभू : आपल्या विविध मागण्या धसास लावण्यासाठी दिल्लीकडे पायी कूच करणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी आपला मोर्चा एका दिवसासाठी स्थगित केला. सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्यामध्ये काही शेतकरी जखमी झाल्याने शुक्रवारी एका दिवसासाठी मोर्चा स्थगित करीत असल्याचे पंजाबमधील एका शेतकरी नेत्याने सांगितले.

काही शेतकरी जखमी झाल्याने आम्ही जथा माघारी बोलाविल्याचे सर्वनसिंग पंधेर यांनी सांगितले. हरयाणा सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामध्ये पाच-सहा आंदोलनकर्ते शेतकरी जखमी झाले, असे पंधेर यांनी सांगितले. संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर सभा या शेतकऱ्यांच्या दोन संघटना बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार आहेत.

शंभू सीमेवरून १०१ शेतकऱ्यांचा एक जथा शुक्रवारी दिल्लीकडे पायी कूच करीत होता, मात्र काही मीटर अंतरावरच अडथळे टाकून या शेतकऱ्यांना रोखण्यात आले. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या अनेक नळकांड्या फोडल्या. त्यामध्ये काही शेतकरी जखमी झाले आणि त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे सांगून हरयाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पिकांच्या किमान आधारभूत किमतीला कायदेशीर हमी देण्याच्या मुख्य मागणीसह आपल्या अन्य मागण्य धसास लावण्यासाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता.

शेतकऱ्यांच्या १२ मागण्या

आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकारपुढे १२ मागण्या ठेवल्या आहेत. या १२ मागण्यांसाठी हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढत आहेत. यामध्ये एमएसपी हमी, भरपाई आणि पेन्शनपासून ते स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाच्या सूचना लागू करण्यापर्यंतच्या मागण्यांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in