
नवी दिल्ली : आपल्या विविध मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी सोमवारी दिल्लीकडे मोर्चा नेला होता. या मोर्चामुळे वाहतूककोंडी झाल्याने सरकारचे धाबे दणाणले होते. अखेर ग्रेटर नोएडा, नोएडा आणि यमुना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत शेतकरी नेत्यांची बैठक झाली. यानंतर हा मोर्चा शेतकऱ्यांनी आठवडाभरासाठी स्थगित केला आहे. यामुळे सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सोमवारी दुपारी नोएडाच्या महामाया फ्लायओव्हरजवळ शेतकरी जमा झाले. संसदेला घेराव घालण्यासाठी ते दिल्लीकडे निघाले असता दलित प्रेरणा स्थळावर पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी शेतकऱ्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. आता आठवड्याभरासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पण, दलित प्रेरणास्थळावर आठवडाभर थांबणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आठवडाभरात काही गोष्टी मान्य न झाल्यास आम्ही पुन्हा दिल्लीला जाऊ. शेतकऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर नोएडा एक्स्प्रेस-वेवरून बॅरिकेडिंग हटवण्यात आले असून वाहनांची वाहतूक सुरू झाली.
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्ली-यूपीला जोडणाऱ्या चिल्ला सीमेवर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. मात्र, शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. मात्र, तेथे वज्र वाहने आणि आरएएफचे जवानही तैनात केले होते. नोएडा एक्स्प्रेस-वे दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आल्याने आणि वाहनांची तपासणी करण्यात आल्याने ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.