
शंभू : दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोर्चा हरयाणा पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा मारा आणि अश्रुधुराचा वापर करून रोखला. त्यात १७ शेतकरी जखमी झाले. त्यामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या आंदोलकांच्या तुकडीला माघारी बोलावण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला.
मागील १० दिवसांत शंभू सीमारेषा ओलांडण्याचा शेतकऱ्यांचा तिसरा प्रयत्न होता. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील संवादाचा अभाव आणि प्रशासनाच्या कारवायांमुळे आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. हरयाणा सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कारवाईनंतर आम्ही आमची तुकडी मागे बोलाविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शेतकरी नेते सरवण सिंग पंधेर यांनी दिली. दिल्लीकडे जाणारे १०१ शेतकरी कायदा आणि सुव्यवस्थेला धोका कसा ठरतात ? तुम्ही संसदेत संविधानावर चर्चा करत आहात, पण कोणते संविधान शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यास परवानगी देते ? एका बाजूला तुम्ही चर्चा करता आणि दुसऱ्या बाजूला पाण्याच्या तोफा आणि अश्रुधुराचा वापर करता? देशाने ठरवावे की हिंसाचार कोणी केला, असे प्रश्न त्यांनी विचारले.
सार्वजनिक शांततेला धक्का लागू नये यासाठी हरयाणा सरकारने १२ गावांमध्ये मोबाईल इंटरनेट आणि एसएमएस सेवा १७ डिसेंबरपर्यंत खंडित केल्या आहेत. दरम्यान, शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांचे खनौरी सीमेवर सुरू असलेले आमरण उपोषण १९ व्या दिवशी पोहोचले आहे.
१८ डिसेंबरला रेल रोको
१६ डिसेंबर रोजी पंजाबव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत 'रेल रोको' आंदोलन केले जाणार आहे. शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनकर्ते किमान आधारभूत किमतीला कायदेशीर हमी देण्याची मागणी करत आहेत.