नवी दिल्ली : केंद्र सरकारचा प्रस्ताव सोमवारी शेतकऱ्यांनी फेटाळल्यानंतर आता दिल्लीकडे कूच करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. २१ फेब्रुवारीला दिल्लीच्या सीमेवर ते केव्हाही धडकण्याची शक्यता असून या संबंधात शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी केंद्रावर निशाणा साधला.
सरकार शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखत आहे मात्र त्यांनी शेतकऱ्यांना बुधवारी त्यांचा मोर्चा काढू द्यावा. आता जे काही घडेल त्याला सरकार जबाबदार असेल, असाही इशारा शेतकरी नेते पंधेर यांनी दिला आहे.
पंधेर म्हणाले की, सरकारचा हेतू अगदी स्पष्ट होता की ते आम्हाला कोणत्याही किंमतीत दिल्लीत घुसू देणार नाहीत. शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढायचा नसेल तर आम्हाला दिल्लीकडे कूच करण्याची परवानगी दिली पाहिजे. जेव्हा आम्ही दिल्लीच्या दिशेने निघालो, गोळीबार झाला. ट्रॅक्टरच्या टायरवरही गोळ्यांचा वापर करण्यात आला. हरयाणाचे पोलीस महासंचालक म्हणतात की ते शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा वापर करत नाहीत. तेव्हा तो वापरणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे. चुकीचे विधानेही केली जात आहेत. हरयाणातही काश्मीरसारखी परिस्थिती आहे. आम्ही २१ फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करणार आहोत. सरकारने आम्हाला प्रस्ताव दिला आहे जेणेकरून आम्ही आमच्या मूळ मागण्यांपासून मागे हटू, असेही पंधेर म्हणाले.
संयुक्त किसान मोर्चाकडून ‘चलो दिल्ली’चे स्वागत
केंद्र सरकारचा किमान आधारभूत किमतीचा प्रस्ताव नाकारण्याच्या दिल्ली चलो आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी नेत्यांच्या निर्णयाचे संयुक्त किसान मोर्चाने मंगळवारी स्वागत केले आणि म्हटले की, हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे, ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये अधिक ऐक्य होईल. २०२०-२१ मधील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने २१ फेब्रुवारी रोजी शेतकरी गटांना भाजप-एनडीए खासदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याचेही आवाहन केले.