‘जेईई-मेन्स’मध्ये शेतकऱ्याचा मुलगा अव्वल; आयआयटी मुंबईतून बी. टेक. करण्याची इच्छा

महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मुलाने देशपातळीवर पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याला १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत.
‘जेईई-मेन्स’मध्ये शेतकऱ्याचा मुलगा अव्वल; आयआयटी मुंबईतून बी. टेक. करण्याची इच्छा
Published on

मेघा चौधरी/मुंबई

देशातील सर्वात कठीण परीक्षा ‘जेईई-मेन्स २०२४’चा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) जाहीर केला आहे. यंदा ५६ मुलांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा मुलगा नीलकृष्ण गजारे याने देशपातळीवर पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याला १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. तर दक्षेश संजय मिश्रा व आराव भट्ट यांना दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला.

गजारे हा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याचे पाचवी ते दहावी दरम्यानचे शिक्षण जेसीआय स्कूलमध्ये झाले.

आपल्या घवघवीत यशाचे श्रेय पालकांना देताना त्याने सांगितले की, चाचणी परीक्षेत मला गुण कमी पडत होते. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला प्रोत्साहन दिले. त्यांनी आणखी चांगली तयारी करून घेतली होती. माझ्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. माझ्या अभ्यासासाठी आई-वडिलांनी आपल्या इच्छा-आकांक्षा दाबून ठेवल्या.

आपल्या भविष्यातील नियोजनाबाबत तो म्हणाला की, मी सध्या ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. मला आयआयटी मुंबईतून संगणक विज्ञान शाखेतून बी. टेक. करायचे आहे.

ही परीक्षा ४ ते १२ एप्रिल दरम्यान झाली. या परीक्षेला १०,६७,९५९ विद्यार्थी बसले होते.

‘जेईई-मेन्स’ या परीक्षेत विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. तेलंगणातील १५, महाराष्ट्र व आंध्रातील ७, दिल्लीतील ६ विद्यार्थी टॉपर ठरले. त्यानंतर हरयाणा, राजस्थान, तामिळनाडू, पंजाब, चंदिगड, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार व कर्नाटक आदी राज्यातील मुले टॉपर ठरली आहेत.

तिरंदाजी खेळाची आवड

गजारे हा तिरंदाजी खेळातही पारंगत आहे. मी राज्य व देश पातळीवर खेळलो आहे. या खेळाने मला ‘लक्ष्यावर’ एकाग्रता करायला शिकवले.

रोज १० ते १२ तास अभ्यास

आपल्या अभ्यासाच्या तयारीबाबत तो म्हणाला की, मी रोज १० ते १२ तास स्वत: अभ्यास करत होतो. मी भौतिकशास्त्राच्या क्लासच्या नोट वाचत होतो. मी जास्तीत जास्त लक्ष गणितावर केंद्रित केले होते, असे त्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in