पॅलेस्टाइनच्या अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला थोडक्यात बचावले : अंगरक्षकाचा मृत्यू

हमास-इस्रायल संघर्ष पेटल्यापासून एका महिन्यात ब्लिंकेन यांनी आखाती देशांचा तीन वेळा दोरा केला आहे.
पॅलेस्टाइनच्या अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला थोडक्यात बचावले : अंगरक्षकाचा मृत्यू

जेरुसलेम : पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास हे त्यांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या गोळीबारातून बचावले आहेत. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या गोळीबारात त्यांच्या एका अंगरक्षकाचा मृत्यू झाला. हल्ल्याची जबाबदारी सन्स ऑफ अबू जंदल या गटाने घेतली आहे.

पॅलेस्टाइनच्या वेस्ट बँक (जॉर्डन नदीचा पश्चिम तीर) या भागावर महमूद अब्बास यांच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) किंवा पॅलेस्टिनीयन ऑथॉरिटीचे प्रशासन आहे. तर पॅलेस्टाइनचाच भाग असलेल्या गाझा पट्टीवर हमास या दहशतवादी संघटनेचा ताबा आहे. मात्र, अब्बास यांच्या गटाने हमासला मान्यता दिलेली नाही. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर आक्रमण केल्यावर इस्रायलने गाझा पट्टीवर आक्रमण केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी प्रशासनाने इस्रायलविरोधात युद्धघोषणा करावी, अशी मागणी सन्स ऑफ अबू जंदल या गटाने केली होती. तसेच अब्बास यांना त्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यावर बुधवारी अब्बास यांच्या वाहन ताफ्यावर वेस्ट बँकमध्ये काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यातून अब्बास बचावले असते तरी त्यांच्या एका अंगरक्षकाचा मृत्यू झाला. अब्बास यांच्या अंगरक्षकांनी प्रसंगावधान राखत प्रतिहल्ला करून दहशतवाद्यांना पिटाळून लावले. या घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवरून प्रसारीत होत आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकेन यांनी वेस्ट बँकला दिलेल्या भेटीनंतर एका दिवसाने हा हल्ला झाला आहे. हमास-इस्रायल संघर्ष पेटल्यापासून एका महिन्यात ब्लिंकेन यांनी आखाती देशांचा तीन वेळा दोरा केला आहे. तिसऱ्या दौऱ्यात त्यांनी वेस्ट बँकमध्ये जाऊन अब्बास यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत वेस्ट बँकमधील प्रशासनाने गाझा पट्टीचाही ताबा घ्यावा, अशी सूचना ब्लिंकेन यांनी अब्बास यांना केली होती. त्यावर अब्बास यांनी म्हटले होते की, इस्रायल-पॅलेस्टाइन प्रश्नावर व्यापक राजकीय तोडगा निघाल्यानंतरच ते शक्य होईल. या भेटीनंतर दोन दिवसांतच अब्बास यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी प्रशासन आणि गाझातील हमास यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा अधोरेखित झाला आहे.

सन्स ऑफ अबू जंदल काय आहे?

अबू जंदल हे प्रेषित मोहम्मद यांचे सहकारी होते. सन्स ऑफ अबू जंदल या गटाचे अनुयायी त्यांना मानतात. वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी प्रशासनाच्या पोलीस दलात या गटाचे बरेच अनुयायी आहेत. त्यांनी पॅलेस्टिनी प्रशासनाचे प्रमुख महमूद अब्बास यांना इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारण्यास सांगितले होते. अन्यथा, अब्बास यांचे आदेश मानणार नाही, अशी धमकीही दिली होती. या गटाने अब्बास यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे

logo
marathi.freepressjournal.in