अर्थपितामह डॉ. मनमोहन सिंग कालवश! रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान असा अनोखा प्रवास; सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

१९९१ मध्ये संकटात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेर काढून देशाला उदारीकरणाची दिशा देणारे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
अर्थपितामह डॉ. मनमोहन सिंग कालवश! रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान असा अनोखा प्रवास; सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Published on

नवी दिल्ली : १९९१ मध्ये संकटात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेर काढून देशाला उदारीकरणाची दिशा देणारे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. शिक्षणतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ, नोकरशहा, राजकारणी आदी सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, केंद्रीय अर्थमंत्री, पंतप्रधान आदी विविध पदे त्यांनी भूषवली व आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती गुरुवारी खालावल्यानंतर रात्रौ ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना दिल्ली येथील ‘एम्स’ रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर ९.५१ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी गुरुचरण सिंग व तीन कन्या असा परिवार आहे. डॉ. सिंग यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, सोनिया गांधी यांनी तत्काळ ‘एम्स’ रुग्णालयात धाव घेतली. सिंग यांच्या निधनाचे वृत्त कळताच बेळगावी येथे सुरू असलेली काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक रद्द करण्यात आली व सर्व नेते दिल्लीला रवाना झाले.

१९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्थेतील वित्तीय तूट ८.५ टक्क्यांवर पोहचली होती. चालू खात्यातील तूट भारतीय विकास दराच्या ३.५ टक्क्यांवर गेली होती. तसेच भारताकडे केवळ १ अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा उरला होता. हा साठा केवळ दोन आठवडे पुरेल इतकाच होता. त्यामुळे देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. भारत सरकारने जागतिक नाणेनिधीकडे मदत मागितली. त्यावेळी जागतिक नाणेनिधीने अनेक अटी भारताला घातल्या होत्या. त्यात परवानाराज पद्धत रद्द करणे, सरकार नियंत्रित अर्थव्यवस्था खुली करणे आदी अटींचा समावेश होता. अर्थमंत्री सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव व काँग्रेस पक्षाला देशावरील गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली. अर्थव्यवस्था खुली न केल्यास व्यवस्था कोसळून पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्याची परवानगी अर्थमंत्री सिंग यांना दिली.

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी गाह, (सध्या पाकिस्तान) पश्चिम पंजाबमध्ये झाला. १९४७ साली ते फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबीयांसह भारतात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवल्यानंतर १९६६-१९६९ या काळात ते संयुक्त राष्ट्रात दाखल झाले. त्यानंतर ललित नारायण मिश्रा यांनी व्यापार व उद्योग खात्याचे सचिव म्हणून त्यांना नियुक्त केले. १९७० ते १९८० च्या काळात भारत सरकारच्या विविध खात्यात त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले. १९७२ ते १९७६ दरम्यान मुख्य आर्थिक सल्लागार, १९८२ ते १९८५ दरम्यान आरबीआयचे गव्हर्नर, १९८५ ते १९८७ दरम्यान नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आदी पदांवर त्यांनी काम केले.

भारत आर्थिक संकटात सापडल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव हे अर्थमंत्री म्हणून अर्थतज्ज्ञाचा व अराजकीय व्यक्तीच्या शोधात होते. विद्वता, सखोल व्यासंग, नोकरशाहीचा व्यापक अनुभव पाहता राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री पदासाठी निवड केली.

अर्थमंत्री म्हणून त्यांनी अर्थव्यवस्थेत मूलगामी बदल केले. भारताची अर्थव्यवस्था त्यांनी खुली केली. पाच वर्षांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळात त्यांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढले व देशात उदारीकरणाचे पर्व सुरू झाले. पण, त्यांनी राजकीयदृष्ट्या अर्थव्यवस्थेत केलेले बदल काँग्रेसला निवडणुकीत यश देऊ शकले नाही. १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते बनले.

त्यांचा प्रामाणिकपणा प्रेरणादायी - प्रियांका गांधी

राजकारणात फार कमी लोकांना मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळतो. त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल.

नेहरू, इंदिरा गांधींनंतर जास्त काळ पंतप्रधानपद भूषवले

२००४ मध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अचानक त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीर केले. हा देशासाठी मोठा धक्का होता. २००४ ते २०१४ दरम्यान त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यानंतर सर्वात जास्त काळ पंतप्रधानपद भूषवणारे ते तिसरे पंतप्रधान ठरले. तसेच पहिलेच शीख पंतप्रधान बनवण्याचा मानही त्यांनी मिळवला. आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम, आधार कार्ड, माहिती अधिकार कायदा आदी अनेक योजना त्यांनी सुरू केल्या.

अमेरिकेशी अणुकरार

आपल्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात विरोधकांचा विरोध झुगारून त्यांनी अमेरिकेसोबत अणुकरार घडवून आणला. त्यावेळी राजकीय किंमत मोजून त्यांनी हा करार घडवला. भारताची अर्थव्यवस्था त्यांच्याच काळात वेगाने घोडदौड करत होती.

३ एप्रिलला संपला होता राज्यसभेचा कार्यकाळ

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ३ एप्रिलला राज्यसभेतून निवृत्त झाले. तब्बल ३३ वर्षे ते राज्यसभेचे सदस्य होते. १९९१ मध्ये पहिल्यांदा ते आसाममधून राज्यसभेत गेले होते. सहाव्या आणि शेवटच्या वेळी ते २०१९ मध्ये राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार झाले.

भारताने आपले सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांना गमावले आहे. नम्रपणा जोपासणारे मनमोहन सिंग अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत देशाच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.

- पंतप्रधान मोदी

ते कायम देशवासियांच्या स्मरणात राहतील - फडणवीस

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

देशाने धुरंधर नेता गमावला - शरद पवार

“भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॉ. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल.

logo
marathi.freepressjournal.in