राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला उपस्थित इमाम उमर अहमदविरोधात फतवा!

व्हीव्हीआयपी पाहुण्यांमध्ये समावेश असलेल्या इमाम यांच्याविरुद्ध फतवा काढण्यात आला आहे. याबाबत त्यांनी सडेतोड उत्तरही दिले आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला उपस्थित इमाम उमर अहमदविरोधात फतवा!

नवी दिल्ली : २२ जानेवारी रोजी अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याला ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनी हजेरी लावली होती. व्हीव्हीआयपी पाहुण्यांमध्ये समावेश असलेल्या इमाम यांच्याविरुद्ध फतवा काढण्यात आला आहे. याबाबत त्यांनी सडेतोड उत्तरही दिले आहे.

आपल्या विरोधात जारी करण्यात आलेल्या फतव्याबाबत उमर अहमद म्हणाले, “मुख्य इमाम या नात्याने मला श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टकडून निमंत्रण मिळाले होते. दोन दिवस विचार करून अयोध्येला जायचे ठरले. हा फतवा एक-दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला असला तरी मला २२ जानेवारीच्या संध्याकाळपासून धमकीचे फोन येत आहेत.”

“मी फतवा मानत नाही, काहीही झाले तरीही मी माफी मागणार नाही. ज्यांना अडचण असेल त्यांनी भारत सोडून खुशाल पाकिस्तानात जावे,” असे प्रत्युत्तर डॉ. इमाम यांनी दिले. डॉ इमाम म्हणाले की, “हा फतवा माझ्या विरोधात आहे. आपल्या देशहिताच्या दृष्टीने हे सौहार्दाचे वातावरण होईल. हा विचार करूनच मी कार्यक्रमाला गेलो होतो. मला माहीत होते की, विरोध होईल. परंतु, इतका विरोध होईल याची कल्पना नव्हती. मी सोहळ्यासाठी अयोध्येत पोहोचलो. अयोध्येत गेल्यानंतर माझे स्वागत करण्यात आले व साधू-संतांनीही मला आदर दिला. आपल्या जाती, पंथ, धर्म, पूजा करण्याच्या पद्धती वेगळ्या असतील. पण सर्वात मोठा धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म आहे. आपण सगळे भारतात राहतो, आपण सगळे भारतीय आहोत. आपण सर्वजण मिळून भारताला मजबूत बनवूया, असे भाष्य मी तिथूनच केले होते. यावरूनच मला फतवा देण्यात आला आहे.”

फतव्यात म्हटले आहे की, “राम मंदिरात जाऊन तुमचे वक्तव्य करण्यापूर्वी तुम्हाला असे वाटले नाही की, तुम्ही मौलाना जमील इलियासी यांचे पुत्र आणि मेवातच्या एका प्रसिद्ध धर्मोपदेशक कुटुंबातील आहात? अरे मुर्ख, तू कधीपासून इमामांचा नेता झालास? हिंदूंच्या दृष्टीने चांगले असायला हवे होते. हिंदूंना खूश करण्यासाठी गेले होते. कोणतीही व्यक्ती खरा मुस्लीम बनू शकत नाही, जोपर्यंत त्याच्यात संपूर्ण मानवता नाही. मग मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे असे म्हणायला कितपत अनुमती देता येईल?”

logo
marathi.freepressjournal.in