नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून काँग्रेस पक्षासाठी तेथे अनुकूल वातावरण आहे, असे सांगून काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्वांना आश्वस्त केले, मात्र आत्मसंतुष्ट-पणा आणि अतिआत्मविश्वास याबाबत सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला लक्षणीय अपयशाचा सामना करावा लागला, असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने त्यामधून कोणताही धडा घेतला नाही, समाजात फूट पाडण्याचे आणि भीतीचे वातावरण पसरविण्याच्या धोरणांचा ते सातत्याने अवलंब करीत आहेत, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळी हस्तक्षेप केला आणि कावड यात्रा मार्गावरील दुकानांवर मालकाच्या नावांचे फलक लावणे बंधनकारक करण्याच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या फतव्याला स्थगिती दिली, असेही गांधी म्हणाल्या. तथापि, हा तात्पुरता दिलासा आहे, नोकरशाहीला रा. स्व. संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी नियम कसे बदलण्यात आले ते पाहा, संघ स्वत:ला सांस्कृतिक संघटना म्हणते, मात्र संघ हा भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे याची संपूर्ण जगाला जाणीव आहे, असेही त्या म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणाची दिशा बदलेल
देशातील महत्त्वाच्या चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात जे अनुकूल वातावरण तयार झाले आहे ते अबाधित ठेवा, आत्मसंतुष्टपणा आणि अतिआत्मविश्वास बाळगू नका, वातावरण आपल्यासाठी अनुकूल आहे. त्यासाठी आपल्याला एकत्रितपणे आणि उद्देश साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. आपण उत्तम काम केले तर लोकसभेच्या निवडणुकीतील यशाचे प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीतही उमटेल आणि त्यामुळे देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.