फेरो स्क्रॅप निगम कंपनीच्या विक्रीची तयारी जोरात

डीआयपीएएमच्या मते अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीसाठी स्वारस्य दाखवले आहे
फेरो स्क्रॅप निगम कंपनीच्या विक्रीची तयारी जोरात

फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड या सरकारी कंपनीची विक्री करण्याची तयारी जोरात सुरू आहे. सचिव, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (डीआयपीएएम) यांनी ट्वीटद्वारे शेअर केलेल्या माहितीनुसार, पोलाद मंत्रालयाला एमएसटीसी लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या वरील मिनीरत्न कंपनीच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी अनेक स्वारस्यपत्रे प्राप्त झाली आहेत.

डीआयपीएएमच्या मते अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीसाठी स्वारस्य दाखवले आहे. आधी ५ मे ही अंतिम तारीख होती. त्यानंतर ती वाढवून १७ जून कंपनीच्या खाजगीकरणासाठी बोली सादर करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, सरकार एमएसटीसी लिमिटेड मार्फत एफएसएनएलमधील १०० टक्के हिस्सा विकत आहे. आर्थिक कामकाजविषयक मंत्रिमंडळ समितीने ऑक्टोबर २०१६ मध्ये धोरणात्मक निर्गुंतवणूक आणि व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणाद्वारे एमएसटीसीद्वारे एफएसएनएलमधील संपूर्ण इक्विटी शेअर होल्डिंगच्या निर्गुंतवणुकीसाठी तत्वतः मान्यता दिली होती. एफएसएनएल ही मेटल स्क्रॅप रिकव्हरी कंपनी असून तिचे नऊ स्टील कारखाने भारतात आहेत.

सरकारने २०२२-२३च्या अर्थसंकल्पात ६५ हजार कोटी रुपये सीपीएसईच्या निर्गुंतवणुकीतून उभे करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आतापर्यंत २४,५४४ कोटी रुपये अल्प हिस्सा विक्रीतून आणि शेअर बायबॅकमधून उभे करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in