फिफाने दिला भारताला मोठा धक्का; फुटबॉल महासंघावर तत्काळ निलंबनाची कारवाई

महिलांच्या अंडर-१७ विश्वचषकाचे आयोजन भारताला करता येणार नाही, असे ‘फिफा’ने स्पष्टपणे म्हटले आहे
फिफाने दिला भारताला मोठा धक्का; फुटबॉल महासंघावर तत्काळ निलंबनाची कारवाई

जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) भारताला मोठा धक्का दिला. फुटबॉल महासंघावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली. भारतीय फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप वाढत असल्याने तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे फिफाने स्पष्ट केले. या कारवाईमुळे भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात नियोजित करण्यात आलेल्या महिलांच्या अंडर-१७ विश्वचषकाच्या यजमानपदाला भारत मुकला आहे. महिलांच्या अंडर-१७ विश्वचषकाचे आयोजन भारताला करता येणार नाही, असे ‘फिफा’ने स्पष्टपणे म्हटले आहे.

फिफाने स्पष्ट केले की, “एआयएफएफ कार्यकारी समितीचे अधिकार ग्रहण करण्यासाठी प्रशासकांची समितीची स्थापन करण्याचा आदेश रद्द झाल्यानंतर आणि एआयएफएफ प्रशासनाला दैनंदिन कामकाजाचे नियंत्रण मिळाल्यानंतर निलंबन मागे घेण्यात येईल,”

भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात ‘फिफा’ असून सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा ‘फिफा’ने व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात भारतीय फुटबॉल महासंघ बरखास्त केला होता. खेळाचे नियोजन करण्यासाठी, महासंघाच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी आणि गेल्या १८ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. न्यायालयाने तत्काळ निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. तीन महिन्यांसाठी निवडणूक समिती अंतरिम संस्था असेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. डिसेंबर २०२०मध्ये फुटबॉल महासंघाची निवडणूक होणे अपेक्षित होते; मात्र घटनेतील काही सुधारणांवरील विरोधामुळे ही निवडणूक रखडली.

‘फिफा’च्या नियमांनुसार, सदस्य असणाऱ्या देशातील संस्थांमध्ये कायदेशीर आणि राजकीय मध्यस्थी होण्यास निर्बंध आहेत. ‘फिफा’ने याआधीही इतर देशातील काही राष्ट्रीय संघटनांवर याच कारणामुळे निलंबनाची कारवाई केली आहे.

फिफा आणि आशियाई फुटबॉल महासंघाने एएफसीचे सरचिटणीस विंडसर जॉन यांच्या नेतृत्वाखालील एक पथक भारतीय फुटबॉल भागधारकांशी चर्चेसाठी पाठविले होते. एआयएफएफने जुलैच्या अखेरपर्यंत आपल्या कायद्यात सुधारणा करावी आणि १५ सप्टेंबपर्यंत निवडणुका घेण्यासाठी धोरण आखावे, यासाठी हे पथक आले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in