झुंजीच्या कोंबड्यांना दिले जातेय व्हायग्रा, खाद्यातही स्टिरॉईडस‌ वापर, उत्तेजना येण्यासाठी अघोरी प्रकार

कोंबड्यांना झुंजवण्यासाठी त्यांना उत्तेजना यावी, यासाठी चक्क व्हायग्राच्या गोळ्या खायला घेतल्याचे समोर आले आहे.
झुंजीच्या कोंबड्यांना दिले जातेय व्हायग्रा, खाद्यातही स्टिरॉईडस‌ वापर, उत्तेजना येण्यासाठी अघोरी प्रकार

विजयवाडा : माणूस स्वत:च्या मनोरंजनासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. बैलगाडा शर्यतींतून हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. आता तर कोंबड्यांना झुंजवण्यासाठी त्यांना उत्तेजना यावी, यासाठी चक्क व्हायग्राच्या गोळ्या खायला घेतल्याचे समोर आले आहे. आंध्र प्रदेशाच्या ग्रामीण भागात संक्रांतीला कोंबड्यांच्या झुंजीची स्पर्धा असते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या कोंबड्यांना काही जण व्हायग्रा खायला घालत असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या खाद्यातही स्टिरॉईडस‌ वापरली जात असल्याचे दिसून आले आहे.

आंध्र प्रदेशातील गुंटूर, कृष्णा आणि गोदावरी या जिल्ह्यांमध्ये संक्रांतीला कोंबड्यांची झूंज लावण्याची परंपरा आहे. या वर्षी आंध्र प्रदेशात संक्रांतीचा उत्सव १४, १५ आणि १६ जानेवारीला साजरा होत आहे. त्यानिमित्त राज्याच्या ग्रामीण भागात हजारो बेकायदेशीर कोंबड्यांच्या झुंजीच्या स्पर्धा लावल्या जातात. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे झुंजीमध्ये भाग घेणाऱ्या कोंबड्यांवर प्रेक्षक पैज लावत असतात. या सट्टेबाजीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे आपलाच कोंबडा झुंज जिंकावा, यासाठी त्याचे मालक हरतऱ्हेचे प्रयत्न करत असतात.

पण अलीकडच्या काळात विषाणूजन्य आजारांमुळे झुंजीचे कोंबडेदेखील ऐन लढतीवेळी ढेपाळतात. त्यामुळे त्याच्या मालकाला मान खाली घालावी लागते. अशावेळी झुंजीमध्ये आपला कोंबडा सरस ठरावा, त्याने प्रतिस्पर्धी कोंबड्यावर मात करावी, यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना व्हायग्राची गोळी खायला घातली जाते.

मानवी वापराची कामोत्तेजक औषधे कोंबड्यांसाठी घातक ठरू शकतात. शिवाय अशा उत्तेजक औषधांचा कोंबड्यांना झुंजीमध्ये फायदा होतो की नाही, हे अद्याप स्पष्टही झालेले नाही. एक शेतकरी सांगतो, ‘रानीखेत’ च्या साथीनंतर आणि श्वासोच्छवासाचे जुनाट आजार पोल्ट्री उद्योगात आल्यानंतर त्यांना चांगल्या प्रतीचे लढाऊ कोंबडे सापडले नाहीत. आम्ही पक्ष्यांच्या लढाऊ जातीला रोगापासून वाचवण्यासाठी खूप पैसा खर्च केला. पण, आम्हाला असे आढळले की पक्ष्यांमध्ये आता ताकद कमी आहे. संक्रांतीसाठी पक्ष्यांना तयार करण्यासाठी हा शॉर्टकट आहे. पक्ष्याचे वजन आणि त्याची चपळता झुंजीमध्ये महत्त्वाची असते. म्हणून आम्ही कोंबड्यांना उत्तेजक औषधे देत आहोत. आम्ही चाचण्या घेत आहोत आणि त्यातून कोंबड्यांच्या लढण्याच्या क्षमतेवर अत्यंत चांगला परिणाम दिसून आला आहे.

गोळ्यांचे दुष्परिणाम

याबाबत तज्ज्ञ सांगतात, ‘‘आंध्र प्रदेशातील कोंबड्यांना ‘रानीखेत’ नावाच्या आजाराने ग्रासले आहे, ज्यामुळे ते अशक्त झाले आहेत आणि ते लढण्याच्या क्षमतेचे राहिलेले नाहीत. संक्रांत तोंडावर येऊन ठेपलेली असताना, काही पोल्ट्री व्यावसायीकांनी पक्ष्यांना शिलाजीत, व्हायग्रा १०० आणि जीवनसत्त्वे देऊन त्यांच्यात ‘जोश’ भरण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण, याचे दुष्परिणाम घातक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘‘जोश वाढवणारी औषधे पक्ष्यांना खाऊ घातल्यास त्यांना दीर्घकाळ अपंगत्व येऊ शकते शिवाय हे कोंबडे माणसांनी खाल्ल्यास मानवी शरिरावरही त्याचे दुष्परिणाम दिसून येतील.

logo
marathi.freepressjournal.in