केजरीवालांविरोधात गुन्हा दाखल करा: कोर्ट

‘आप’चे प्रमुख व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्लीच्या राऊज एवेन्यू कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.
अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवालसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : ‘आप’चे प्रमुख व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्लीच्या राऊज एवेन्यू कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. सरकारी पैशाचा कथित दुरुपयोग केल्याचे हे प्रकरण आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य आरोपींविरुद्ध सरकारी पैशाचा गैरवापर केल्याचा ठपका आहे. कोर्टाने दिल्ली पोलिसांकडे १८ मार्चपर्यंत याबाबतचा अहवाल मागवला आहे. केजरीवाल हे दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर विपश्यना करत आहेत. ते यापूर्वीच विविध कायदेशीर खटल्यात अडकले असतानाच या नवीन आदेशामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

२०१९ मध्ये द्वारकामध्ये मोठे होर्डिंग्ज लावल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल, गुलाब सिंह व द्वारकाच्या नगरसेविका नीतिका शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती.

अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी नेहा मित्तल यांनी केजरीवाल व अन्य व्यक्तींविरोधात याचिका स्वीकारून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यापूर्वी न्यायालयात तक्रार दाखल केली तेव्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही तक्रार फेटाळून लावली होती. त्यानंतर तक्रारदाराने सत्र न्यायालयात अपील केले. सत्र न्यायालयाने हे प्रकरण न्यायदंडाधिकारी न्यायालयात पाठवून दखलपात्र गुन्हा शक्य आहे की नाही, हे ठरवावे, असे आदेश दिले. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दुसऱ्यांदा याबाबत सुनावणी करून मंगळवारी अर्ज स्वीकारून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ

केजरीवाल यांच्यावर यापूर्वी कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात त्यांना अनेक महिने तुरुंगातही राहावे लागले आहे. आता या नव्या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in