हल्लेखोरांना पाताळातूनही शोधू! मालवाहू जहाजांवरील हल्ल्यावर राजनाथ सिंह आक्रमक

भारतात खनिज तेल घेऊन येणाऱ्या एमव्ही केम प्लुटो या मालवाहू जहाजावर शनिवारी गुजरातपासून २१७ सागरी मैलांवर अरबी समुद्रात ड्रोन हल्ला झाला.
हल्लेखोरांना पाताळातूनही शोधू! मालवाहू जहाजांवरील हल्ल्यावर राजनाथ सिंह आक्रमक
PM
Published on

मुंबई : भारतीय मालवाहू जहाजांवर नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्यांना जबाबदार असलेल्या व्यक्तींना पाताळातूनही शोधून काढून शिक्षा देऊ, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दिला. मुंबईतील माझगाव गोदीत आयएनएस इम्फाळ या स्वदेशी बनावटीच्या स्टेल्थ विनाशिकेला नौदलात सामील करण्यात आले. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केले. हे हल्ले झालेल्या परिसरात नौदलाने चार विनाशिका आणि गस्ती विमानांसह हेलिकॉप्टर्स तैनात केली असल्याची माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी दिली.

भारतात खनिज तेल घेऊन येणाऱ्या एमव्ही केम प्लुटो या मालवाहू जहाजावर शनिवारी गुजरातपासून २१७ सागरी मैलांवर अरबी समुद्रात ड्रोन हल्ला झाला. या जहाजावर २० भारतीय कर्मचारी होते. त्या पाठोपाठ तांबड्या समुद्रात एमव्ही साईबाबा या जहाजावरही हल्ला झाला. त्यावर २५ भारतीय कर्मचारी होते. दोन्ही हल्ल्यांत कोणालाही दुखापत झाली नाही. केम प्लुटोवर हल्ला करणारा ड्रोन इराणमधून आला होता, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण खात्याने (पेंटॅगॉन) नंतर दिली. इराणने त्या वृत्ताचा इन्कार केला आहे. इराणचे समर्थन असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांनी गेल्या काही दिवसांत तांबड्या समुद्रात इस्रायलकडे जाणाऱ्या अनेक जहाजांवर हल्ले केले आहेत. पण, भारतीय जहाजांवरील हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

भारतीय मालवाहू जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना ते समुद्राच्या तळाशी लपले असले तरी शोधून काढू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

सागरी गस्तीत वाढ

हा हल्ला भारताने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. गेल्या काही दिवसांत तांबडा समुद्र आणि आसपासच्या प्रदेशातील वातावरण बिघडले आहे. सागरी चाचे आणि बंडखोरांच्या बंदोबस्तासाठी भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने युद्नौका, टेहळणी विमाने आणि हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत. तसेच सागरी गस्तीत वाढ केली असून नौदलांला सतर्क केले आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

एमव्ही केम प्लुटो मंबईत दाखल

ड्रोन हल्ला झालेले अमव्ही केम प्लुटो हे जहाज मंगळवारी मुंबई बंदरात दाखल झाले. हल्ला झाल्यानंतर तटरक्षक दलाच्या विक्रम या नौकेने या जहाजाला मुंबईपर्यंत संरक्षण पुरवून साथ दिली. जहाजाच्या मागील भागात ड्रोन हल्ला झाला असून त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. नौदलाच्या स्फोटकतज्ज्ञांनी जहाजाचे परीक्षण केले असून नेमकी कोणती आणि किती स्फोटके वापरली गेली, याचा शोध घेतला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in