अहमदाबाद : बांधकाम सुरू असलेल्या साबरमती बुलेट ट्रेन स्थानकात शनिवारी पहाटे आग लागली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ही आग सकाळी ६.३० वाजता लागली असून कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही, असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग आटोक्यात आणण्यासाठी १३ अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आले आणि आग नियंत्रणात आणण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या निवेदनानुसार आग ही बांधकामस्थळी छताच्या शटरिंगच्या एका भागात लागली. प्राथमिक तपासणीनुसार तात्पुरत्या शटरिंगच्या वेल्डिंगमधून ठिणग्या उडाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार वेल्डिंगमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागली असावी, असे कंपनीने सांगितले. कंपनीचे अधिकारी घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
हे स्थानक ५०८ किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भाग आहे. प्रकल्पांतर्गत गुजरातमध्ये ३५२ किमी आणि महाराष्ट्रात १५६ किमी पट्टा समाविष्ट आहे. एकूण १२ स्थानकांचा समावेश असून ही स्थानके मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद/नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती येथे असतील.