दरभंगा एक्स्प्रेसच्या तीन बोगींना आग

रेल्वे अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे सांगण्यात आले.
दरभंगा एक्स्प्रेसच्या तीन बोगींना आग

नवी दिल्ली : नवी दिल्ली-दरभंगा स्पेशल एक्स्प्रेस या गाडीच्या तीन बोगींना उत्तर प्रदेशात इटावाजवळ बुधवारी सायंकाळी आग लागली. यामध्ये कोणीही भाजल्याचे वा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. काळा धूर या डब्यांमधून येऊ लागला. यात एक बोगी पूर्ण जळू लागली आणि बाजूच्या दोन बोगींचे अंशत: नुकसान झाले, अशी माहिती इटावाचे पोलीस अधीक्षक संजाई कुमार यांनी दिली. आगीनंतर चार डबे रेल्वे गाडीपासून दूर करण्यात आले. अनेक प्रवाशांचे सामान या आगीमुळे डब्यात जळून गेले. आगीची माहिती मिळताच आगीचे बंब व रुग्णवाहिकाही त्वरेने रवाना करण्यात आल्या होत्या. तसेच आगीमुळे रेल्वे ताबडतोब थांबविण्यात येऊन प्रवाशांना खाली उतरविण्यात आले होते. रेल्वे अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in