सुखबीरसिंग बादल यांच्यावर गोळीबार; सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावरच हल्ला सुदैवाने बचावले, हल्लेखोराला पकडले

शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांच्यावर बुधवारी सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावरच एका व्यक्तीने गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पंजाबमधील या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
सुखबीर सिंग बादल
सुखबीर सिंग बादलएएनआय
Published on

अमृतसर : शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांच्यावर बुधवारी सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावरच एका व्यक्तीने गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पंजाबमधील या घटनेमुळे खळबळ माजली आहे. सुदैवाने या हल्ल्यात बादल बचावले आहेत. ही घटना घडताच तेथे हजर असलेल्या लोकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. हल्लेखोराचे नाव नारायणसिंग चौरा असे आहे. मात्र हा गोळीबार का करण्यात आला त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये निळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेले बादल चाकांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. बादल यांना अकाल तख्तकडून धार्मिक शिक्षा देण्यात आली होती, बादल यांच्या पायाला दुखापत झाली असल्याने ते चाकांच्या खुर्चीत बसून सुवर्ण मंदिराबाहेर सेवा करीत होते.

शौचालय स्वच्छतेची शिक्षा

शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर गंभीर आरोप करत 'अकाल तख्त’चे जथेदार ग्यानी रघुबीर सिंग यांनी सोमवारी बादल आणि इतर वरिष्ठ नेत्यांना ‘तनखा’ (धार्मिक शिक्षा) ठोठावली होती. या शिक्षेचा एक भाग म्हणून बादल यांना शौचालये स्वच्छ करणे, लंगरमध्ये सेवा करणे, नितनेम (दररोज शीख प्रार्थना) करणे आणि सुखमनी साहिबचे पठण करण्याची शिक्षा ठोठावली होती.

आरोग्याच्या तक्रारींमुळे सुखबीर बादल आणि सुखदेवसिंग धिंडसा यांना गुरूंच्या निवासस्थानी दोन दिवस द्वारपाल म्हणून काम करण्यास, पारंपरिक सेवक पोशाख घालून भाले धारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बादल हे तेव्हापासून सेवादार म्हणून सुवर्णमंदिरात सेवा देत आहेत.

हल्लेखोर चौरा कोण?

सुखबीर सिंग बादल यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते चाकांच्या खुर्चीवर बसले होते. यावेळी हल्लेखोराने त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळच्या लोकांनी रोखल्याने चौरा याने झाडलेली गोळी भिंतीवर लागली. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या नारायण सिंग चौरा याचा खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध होता. चौरा याच्या विरोधात यापूर्वी बेकायदा कृत्ये प्रतिबंध कायद्याअंतर्गत (यूएपीए) अनेक वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच दहशतवादासंबंधी कारवायांमध्ये सहभाग समोर आल्याने त्याला तुरूंगात देखील टाकण्यात आले होते.

दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौरा हा १९८४ साली पाकिस्तानात निघून गेला होता आणि दहशतवादी कारवायांसाठी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करत असे. पाकिस्तानमध्ये असताना त्याने गनिमीकाव्याबाबत देशविरोधी पुस्तकेही लिहिली. तो १९९० च्या दशकात भारतात परत आला आणि त्यानंतरदेखील तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेत राहिला.

चौरा याला बुरैल जेलब्रेक प्रकरणात देखील अटक करण्यात आली होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग यांच्या मारेकर्‍यांना २००३-२००४ मध्ये चंदीगडच्या बुरैल तुरुंगात मोबाइल फोन आणि इतर अवैध साहित्य पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. पुढे चौरा याची २०२२ मध्ये जामिनावर सुटका झाली. त्याच्यावर अमृतसर, रोपर, तरन तारन यासह पंजाबमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

logo
marathi.freepressjournal.in