मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या ‘स्लिपर कोच’ आवृत्तीचे खरे रूप रविवारी सर्वांसमोर आले. वंदे भारत ‘स्लिपर कोच ट्रेन’ने अधिक आरामयादी प्रवास होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी ‘स्लिपर कोच’च्या मूळ नमुन्याची झलक सादर केली. येत्या तीन महिन्यांत हे ‘स्लिपर कोच’ प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असेही त्यांनी सांगितले.
बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने या ‘स्लिपर ट्रेन’ची निर्मिती केली असून पुढील १० दिवसांत या ‘ट्रेन’च्या विविध कठोर चाचण्या आणि प्रयोग केले जाणार आहेत. त्यानंतर ही ट्रेन ट्रॅकवर चाचण्यांसाठी उतरवण्यात येईल. “खुर्चीवर बसून प्रवास करणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यानंतर आम्ही ‘स्लिपर कोच’चा समावेश असलेल्या वंदे भारत ट्रेनवर मेहनत घेत होतो. ’स्लिपर ट्रेन’चे उत्पादन आता पूर्ण झाले असून ही ट्रेन चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे,” असे वैष्णव यांनी सांगितले.
भारतीय रेल्वे आता वंदे भारत चेअर कार्स, वंदे भारत स्लिपर कार्स, वंदे भारत मेट्रो कार्स आणि अमृत भारत या चार वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनवर काम करत आहे. त्यामुळे पर्यटकांना एका आगळ्यावेगळ्या प्रवासाचा आनंद मिळू शकेल. वंदे भारत ‘स्लिपर ट्रेन’ ही १६ डब्यांची असून ती ताशी १६० किमीच्या वेगाने रात्रीच्या प्रवासाकरिता तयार करण्यात आली आहे. ८०० ते १२०० किलोमीटरच्या अंतरासाठी ही ट्रेन असेल. कोरोना महामारीपासून धडा घेत या ट्रेनमध्ये विषाणूपासून संरक्षण करणारी वैशिष्ट्ये असतील. राजधानी ट्रेनसाठी आकारले जाणारे भाडे वंदे भारत ‘स्लिपर ट्रेन’साठी आकारण्यात येणार असून त्यामुळे मध्यमवर्गीयांनाही किफायतशीर दरात प्रवास करता येणार आहे.
१६ डब्ब्यांच्या या ट्रेनमधून ८२३ प्रवाशांना प्रवास करता येईल, एसी-३ टायरचे ११ डबे, एसी २ टायरचे ४ डबे, सिंगल एसी फर्स्ट क्लासचा एक डबा अशी बसण्याची व्यवस्था असेल. एसी ३ टायरमधून ६११ प्रवाशी तसेच एसी २ टायरमधून १८८ प्रवाशी आणि फर्स्ट क्लासच्या डब्यातून २४ प्रवाशांना प्रवास करता येणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुविधा असतील. तसेच ३ टायर एसीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता वरच्या सीटवर चढण्यासाठी जिने बसवण्यात आले आहेत. एसी २ टायरमध्ये सेंसरवर आधारित प्रकाशयोजना असेल. फर्स्ट क्लास डब्यात आवाज प्रतिरोधक यंत्रणा असेल.