मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरुद्ध खासदार विजय बघेल हे मैदानात उतरणार आहेत
मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन भाजपने आपली रणनीती आखायला सुरुवात केली असून, भाजपने गुरुवारी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करून टाकली आहे. भाजपने मध्य प्रदेशातील ३९, तर छत्तीसगडमधील २१ उमदेवारांच्या नावाची गुरुवारी घोषणा केली.

मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा आहेत, तर छत्तीसगडमध्ये ९० जागा आहेत. मध्य प्रदेशात २०१८ च्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला होता. कमलनाथ यांनी सरकारही बनवले होते. मात्र, भाजपने काँग्रेसमध्ये फूट पाडून सत्ता काबीज केली आहे. छत्तीसगडमध्ये २०१८ ला काँग्रेसने भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या रमणसिंह यांची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली होती. तिथेही भाजपने काँग्रेसचे सरकार उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही राज्यांवर पुन्हा निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी भाजपने या दोन्ही राज्यांत पहिली उमेदवार यादी जाहीर करत विरोधकांना धक्का दिला आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे. या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाने पाच राज्यांतील कमकुवत मतदारसंघांवर चर्चा केली. मध्य प्रदेशच्या ३९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत सरला रावत, अदल सिंह कंसाना, लाल सिंह आर्य, प्रीतम लोधी, प्रियंका मीणा, जगन्नाथ सिंह, वीरेंद्र सिंह लंबरदार, कामाख्या प्रताप सिंह, ललिता यादव, लखन पटेल, राजेश कुमार वर्मा या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे, तर छत्तीसगडमध्ये भूलन सिंह मरावी, लक्ष्मी राजवाडे, शकुंतला सिंह, रामविचार नेताम, प्रबोज भौंज, महेश साहू, हरिश्चंद्र राठिया यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरुद्ध खासदार विजय बघेल हे मैदानात उतरणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in