First Voter of India : देशातील सर्वात पहिल्या मतदाराने जाता जाता बजावला मतदानाचा हक्क! जाणून घ्या सविस्तर...

वयाच्या शंभरी नंतरही 'मी मतदान हे मतदान केंद्रावरच जाऊन करणार' असा हट्ट धरणारे श्याम शरण नेगी (First Voter of India) यांचे निधन झाल्याने देशभरातून शोक व्यक्त
First Voter of India : देशातील सर्वात पहिल्या मतदाराने जाता जाता बजावला मतदानाचा हक्क! जाणून घ्या सविस्तर...

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार (First Voter of India) म्हणून ओळख असलेले श्याम शरण नेगी यांचे वयाच्या १०६व्या वर्षी निधन झाले. हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथे राहणाऱ्या नेगी यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी २ नोव्हेंबर रोजी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला होता. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हा प्रशासनाकडून शासकीय व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

वयाच्या १०६व्या वर्षीही श्याम सरन नेगी यांनी पोस्टल मतदानासाठीचा १२-डी फॉर्म परत केल्यामुळे चर्चेत आले होते. 'मी मतदान हे मतदान केंद्रावरच जाऊन करणार' असे सांगत त्यांनी फॉर्म अधिकाऱ्यांकडे परत पाठवला होता. मात्र, त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी नेगी यांच्या कल्पा येथील घरी जाऊन पोस्टल मतदान घेतले. २ नोव्हेंबर रोजी केलेले मतदान नेगी यांचे शेवटचे मतदान ठरले.

किन्नोर येथे पहिले मतदान २५ ऑक्टोबर १९५१ मध्ये झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मंडी-महासु (मंडी) या क्षेत्रासाठी मतदान केले होते. निवडणूक आयोगाने १९५२ च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पहिल्या निवडणुका होतील असे जाहीर केले होते. मात्र, काही कारणांनी हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये त्याआधीच निवडणूका घेण्यात आल्या. नेगी यांनी त्यावेळी किन्नोर येथील मतदान केंद्राचे अधिकारी म्हणून भूमिका बजावली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in