नवी दिल्ली : सध्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी कमालीच्या बदलू लागल्या आहेत. काही जणांनी संपूर्ण शाकाहार पत्करला असला तरी अस्सल नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. त्यातल्या त्यात मासे खाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. २००५मध्ये मासे खाण्याचे प्रमाण ४.९ किलो इतके होते ते २०२१मध्ये ८.८९ किलोवर गेल्याचे एका आकडेवारीवरून समोर आले आहे. "दरडोई मासळीचा वार्षिक वापर ४.९ वरून ८.८९ किलो पर्यंत वाढला आहे, ४.०५ टक्के वाढीसह ३.९९ किलो (८१.४३ टक्के) वाढ झाली आहे", असे एका अहवालात म्हटले आहे.
‘वर्ल्डफिश’ने इंडियन कौन्सिल ऑफ ॲॅग्रिकल्चर रिसर्च आणि अन्य भारतीय सरकारी संस्थांसोबत मिळून केलेल्या अभ्यासानुसार, दरडोई वार्षिक मासे खाण्याचे प्रमाण ७.४३ किलो ते १२.३३ किलो इतके आहे. याचा अर्थ त्यात ४.९ किलो म्हणजेच ६६ टक्के इतकी वाढ झाली आहे. २००५ ते २०२१ या कालावधीत देशाची मासे उत्पादक क्षमता १४.१६४ दशलक्ष टन इतकी आहे. त्यात दरवर्षी ५.६३ टक्के इतकी वाढ झाली आहे.
मासे मिळण्याच्या एकूण प्रमाणापैकी २००५-२००६मध्ये देशात ८२.३६ टक्के मासे खाल्ले जात होते. हेच प्रमाण २०१५-१६मध्ये ८६.२ तर २०१९-२०मध्ये ८३.६५ टक्के इतके होते. उर्वरित मासे एकतर निर्यात केले जात होते, किंवा अन्य कारणांसाठी त्याचा वापर केला जात होता.
त्रिपूरामध्ये मासे खाण्याचे प्रमाण सर्वाधिक
देशात स्थानिक बाजारांमध्ये असलेली माशांची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे मासे खाण्याच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. त्रिपूरामध्ये मासे खाण्याचे प्रमाण सर्वाधिक असून तिथे ९९.३५ टक्के जण मासे खातात. हरयाणामध्ये सर्वाधिक कमी म्हणजेच २०.५५ टक्के जनता मासे खाते. तामिळनाडू, केरळ आणि गोवा येथेही मासे खाणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून तिथे ९० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक मासे खातात. महाराष्ट्रात मात्र किती टक्के जनता मत्स्यप्रेमी आहे, याचे आकडेवारी या अभ्यासाद्वारे उपलब्ध होऊ शकली नाही. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या उत्तरेकडील राज्यांमध्ये सर्वात कमी (३० टक्क्यांहून कमी) प्रमाण आहे. तर, केरळ (५३.५ टक्के) आणि गोवा (३६.२ टक्के) मध्ये दैनंदिन मासळी ग्राहकांची सर्वाधिक टक्केवारी आणि आसाम (६९ टक्के) आणि त्रिपुरा (६९ टक्के) साप्ताहिक ग्राहकांची सर्वाधिक टक्केवारी आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये मासे खाणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक (२०.९ टक्के गुण) वाढ झाली आहे. तथापि, पंजाबमध्ये मासे खाणाऱ्यांमध्ये (३.९ टक्के गुण) घट झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.
परदेशातून मासे आयात करण्याचे प्रमाण वाढले
देशातील मत्स्यप्रेमींची भूक भागवण्यासाठी बाहेरच्या देशांतून मासे आणि मत्स्यविषयक उत्पादने आयात करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचेही आकडेवारीवरून समोर आले आहे. २००५-२६मध्ये १४ हजार टन मासे किंवा त्यासंबंधित उत्पादने आयात केली जायची. तेच प्रमाण २०१९-२०मध्ये ७६ हजार टनांवर पोहोचले आहे.