तंदुरुस्तीसाठी नवीन नियम लागू,लष्करी अधिकाऱ्यांचा 'फिटनेस' घसरला

तंदुरुस्तीसाठी नवीन नियम लागू,लष्करी अधिकाऱ्यांचा 'फिटनेस' घसरला

देशाच्या लष्करातील अधिकाऱ्यांना अनेकदा आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काही अधिकारी लठ्ठपणा तसेच इतर आजारांनी त्रस्त होतात. ही समस्या लक्षात घेऊन भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : देशाच्या लष्करातील अधिकाऱ्यांना अनेकदा आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काही अधिकारी लठ्ठपणा तसेच इतर आजारांनी त्रस्त होतात. ही समस्या लक्षात घेऊन भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. लष्करी अधिकारी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त (फिट) असावेत, या उद्देशाने लष्कराच्या सर्व कमांड्सना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे नव्या नियमावलीची माहिती दिली आहे. अनेकदा देशांतर्गत तसेच देशाबाहेरील मोहिमेवर असलेल्या अधिकाऱ्यांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात.

नव्या बदलानुसार ब्रिगेडियर रँकवरील अधिकाऱ्याकडून अधिकारी तसेच जवानांची फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. याआधी कमांडिंग ऑफिसरकडून जवानांची दर तीन महिन्यांच्या अंतराने फिटनेस टेस्ट घेतली जात होती. सध्या प्रत्येक जवान व अधिकाऱ्याच्या शारीरिक तंदुरुस्तीची नोंद एपीएसी कार्डवर केली जाते.

भारतीय लष्कराकडून अधिकारी व जवानांची शारीरिक कार्यक्षमता तपासण्यासाठी दर तीन महिन्यांच्या अंतराने दोन चाचण्या घेतल्या जातात. युद्ध शारीरिक कार्यक्षमता चाचणी व शारीरिक कार्यक्षमता चाचणी अशी या चाचण्यांची नावे आहेत. प्रत्येक जवानाच्या शारीरिक चाचणीच्या निकालाची नोंद एसीआर (वार्षिक गुप्तता अहवाल) मध्ये नोंदवून घेतली जाते.

दोन नियमित चाचण्यांबरोबरच आणखी एक चाचणी केली जाणार आहे.

दर सहा महिन्यांनी फिटनेस टेस्ट

दोन नियमित चाचण्यांसमवेत आता आणखी एक चाचणी लष्करी अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. त्यानुसार दर सहा महिन्यांनी १० किमी स्पीड मार्च, ३२ किमी रूट मार्च व वर्षातून एकदा ५० मीटर जलतरण चाचणी अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. नव्या धोरणानुसार, या चाचण्यांमध्ये लठ्ठपणामुळे अपयशी होणाऱ्या अधिकाऱ्यांना वजन कमी करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी त्यांना लेखी माहिती पुरवली जाणार आहे. गरज पडल्यास त्यांच्या सुट्ट्यांमध्ये कपातही होऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in