लष्करचे पाच दहशतवादी ठार

सध्या काश्मीर खोऱ्यात एकूण १३० दहतशतवादी सक्रिय असून त्यापैकी निम्मे विदेशी असल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे
लष्करचे पाच दहशतवादी ठार

श्रीनगर : येथील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी गुरुवारी माछिल सेक्टर नियंत्रणरेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच लष्कर ए तोयबाच्या घुसखोर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आणि घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. मागील पाच दिवसांत काश्मीरमध्ये हाणून पाडलेली घुसखोरीची ही दुसरी घटना आहे. याआधी २२ ऑक्टोबर रोजी बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये दोन घुसखोरांना यमसदनी धाडण्यात आले होते. सुरुवातीस दोन दहशतवादी ठार झाले होते, नंतर आणखी तीन दहशतवादी मारले गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी लष्कर ए तोयबा या अतिरेकी संधटनेचे आहेत. अलीकडच्या काळात सुरक्षा दलाकडून दहशतवादविरोधी कारवार्इसाठी स्थानिक पोलिसांचा वाढता वापर केला जात आहे. पूर्वी लष्कराकडून काही विशेष कारवाया करतानाच स्थानिक पोलिसांची मदत घेतली जात असे. माछिल नियंत्रणरेषेवर अजूनही कारवार्इ सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे महासंचालक दिलबाग सिंग यांच्या माहितीनुसार, नियंत्रणरेषेपलीकडे अजूनही १६ दहशतवादी प्रशिक्षण तळ सुरू असून तेथून पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसवण्याचा प्रयत्न केला जातो. बुधवारी जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या उच्चाधिकाऱ्यांची श्रीनगर येथे बैठक झाली. या बैठकीत काश्मीरमध्ये विदेशी दहशतवाद्यांचा सहभाग हा चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. स्थानिक लोक दहशतवादी संघटनांत घुसण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे विदेशी दहशतवाद्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यंदा या केंद्रशासित प्रदेशात एकूण ४६ दहशतवादी ठार झाले असून त्यापैकी तब्बल ३७ जण पाकिस्तानी असून केवळ ९ दहशतवादी स्थानिक आहेत. गेल्या ३३ वर्षांत प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या विदेशी दहशतवाद्यांची संख्या स्थानिक दहशतवाद्यांच्या तुलनेत चारपट आहे. सध्या काश्मीर खोऱ्यात एकूण १३० दहतशतवादी सक्रिय असून त्यापैकी निम्मे विदेशी असल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in