विमानाच्या उड्डाणाला तब्बल 13 तास उशीर झाल्यामुळे चिडलेल्या एका प्रवाशाना थेट को-पायलटला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी दिल्लीहून गोव्याला येणाऱ्या इंडिगोच्या (6E-2175) विमानात ही घटना घडली. या घटनेनंतर प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
चलाना है तो चला नहीं तो खोल गेट...
सकाळी 7.40 वाजता विमानाचे उड्डाण होणार होते, पण धुक्यामुळे बराच उशीर झाला. उड्डाणाला उशीर झाल्याची माहिती सहवैमानिक देत होता. त्याचवेळी चिडलेला एक प्रवासी धावत सहवैमानिकाच्या अंगावर आला आणि त्याच्या तोंडावर जोरदार मुक्का मारत, 'चलाना है तो चला, नहीं चलाना तो मत चला, खोल गेट' असे म्हटले. अन्य कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करीत प्रवाशाला बाजूला केले.
घटनेनंतर उपस्थित अन्य प्रवाशांनीही मारहाणीचा निषेध केला. यानंतर त्याला विमानातून बाहेर काढून सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले. साहिल कटारिया असे या प्रवाशाचे नाव आहे. इंडिगोने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला असून तो दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. "आम्हाला तक्रार मिळाली आहे आणि योग्य कायदेशीर कारवाई करत आहोत'' असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावर विमान उड्डाणाला मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत असताना ही घटना घडली. रविवारी जवळपास 110 विमानांना उशिर झाला आणि 79 विमाने रद्द करण्यात आली.