

बंगळुरू : हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या 'फ्लाय९१' एअरलाईन्सच्या विमानाला रविवारी खराब हवामानाचा मोठा फटका बसला. हुबळीमध्ये उतरणे शक्य नसल्याने हे विमान बंगळुरूच्या दिशेला वळवण्यात आले. या अनपेक्षित बदलामुळे आणि विमान बराच वेळ हवेत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
घटना काय
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान दुपारी ३ च्या सुमारास हैदराबादवरून रवाना झाले होते. नियोजित वेळेनुसार ९० मिनिटांत ते हुबळीला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, हुबळी परिसरात हवामान अत्यंत खराब असल्याने वैमानिकाला लँडिंगसाठी परवानगी मिळाली नाही.
प्रवाशांना रडू कोसळले
हवामान सुधारेल या आशेने वैमानिकाने सुमारे एक तास हुबळीच्या आकाशात विमानाने घिरट्या घातल्या. विमान साडेतीन तास हवेतच राहिल्याने विमानातील २२ प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही प्रवासी चक्क रडू लागले, तर काही जण सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागले. अखेर सुरक्षिततेचा उपाय म्हणून विमान बंगळुरूकडे वळवण्यात आले.
संध्याकाळी ६:३० च्या सुमारास विमान बंगळुरूमध्ये सुखरूप उतरले. त्यानंतर रात्री ११ वाजता हवामान सुधारल्यावर विमानाने पुन्हा हुबळीसाठी उड्डाण केले.
इतर विमानांनाही फटका
केवळ हुबळीच नव्हे, तर या भागातील इतर विमानसेवेलाही हवामानाचा फटका बसला. मुंबई-कोल्हापूर विमानदेखील हवामानाअभावी गोव्याच्या दिशेने वळवावे लागले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या हुबळी विमानतळावरील व्यवहार सुरळीत असून सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.