
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखनऊमधील पारा परिसरात एका सरकारी पुनर्वसन केंद्रात झालेल्या अन्न विषबाधेमुळे ४ मुलांचा तडफडून मृत्यू झाला, तर २० मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
या केंद्रात राहणारी २० मुले मंगळवारी संध्याकाळी अचानक आजारी पडली. त्यानंतर या मुलांना लोकबंधू रुग्णालयात नेण्यात आले. लोकबंधू राज नारायण संयुक्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव कुमार दीक्षित यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी पुनर्वसन केंद्रातील सुमारे २० मुलांना रुग्णालयात आणण्यात आले. ही सर्व मुले मानसिकदृष्ट्या अपंग आहेत. जेव्हा या मुलांना रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हा त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर होती.
चौकशी समितीची स्थापना
या घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. लखनऊच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या अन्न विषबाधेमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना केली आहे. तपासासाठी पुनर्वसन केंद्रामधून जेवणाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर या तपासासाठी नगर निगम आणि अन्न विभागाच्या पथकालाही तैनात करण्यात आले आहे. केंद्राने या घटनेची माहिती योग्य वेळी रुग्णालयाला का दिली नाही, याचाही तपास होणार आहे.