राष्ट्राच्या सुदृढतेसाठी संविधानातील मूल्य रुजली पाहिजेत ;प्रसाद कुलकर्णी यांचे मत

अध्यक्षस्थानावरून बोलताना शिरीष देसाई यांनी श्री बिरदेव शिक्षण मंडळाच्या वतीने संविधान साक्षरता आणि संविधान जागृतीसाठी केलेल्या उपक्रमाच्या आढावा घेतला.
राष्ट्राच्या सुदृढतेसाठी संविधानातील मूल्य रुजली पाहिजेत ;प्रसाद कुलकर्णी यांचे मत
Published on

पट्टणकोडोली : भारतीय राज्यघटना स्वातंत्र्य ,सार्वभौमत्व, संघराज्यीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही या महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानावर उभी आहे. राजकीय,आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात सुदृढ लोकशाही असणे फार महत्वाचे आहे. ती सुदृढता भारतीय राज्यघटनेची मूल्ये नव्या पिढीत रुजवूनच शक्य होईल. तो प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून श्री बिरदेव शिक्षण संस्था करत आहे. भारतीय राज्यघटनेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी या संस्थेने स्वतः पुस्तके प्रकाशित केली आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली ही अतिशय कौतुकास्पद व अनुकरणीय बाब आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते श्री बिरदेव शिक्षण संस्था पट्टण कोडोली संचालित अनंत विद्या मंदिर व न्यू इंग्लिश स्कूल येथे संविधान दिन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिरीष देसाई होते. भगवान निगवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संविधान निर्मिती प्रक्रियेचे संगणकीय सादरीकरणही करण्यात आले. आणि पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास आणि स्वातंत्र्यानंतर तयार झालेले संविधान आणि खास करून त्याचा सरनामा त्यातील प्रत्येक शब्दाच्या अन्वयार्थासह जाणून घेतला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व ध्यानात घेऊन लोकांनी व्यक्त झाले पाहिजे. अंतिम सत्ता लोकांची असते त्यामुळे लोकांच्या सार्वभौम सत्तेचा संविधान महत्त्वाची मानते. भारत विविध राज्यांचे मिळून एक राष्ट्र असल्यामुळे इथल्या संघराज्याची एकात्मतेचा जयघोष संविधान करते. व्यक्तीला श्रद्धा ,उपासना यासारखे धर्म स्वातंत्र्य आहेच पण राष्ट्राला धर्म असणार नाही हा धर्मनिरपेक्षतेचा विचार महत्वाचा आहे. घटनेला अभिप्रेत असलेल्या समाजवादात या देशात कोणीही अन्न, वस्त्र आणि निवारा यापासून वंचित राहू नये अशी व्यवस्था आणून पाहणारा आहे. आपली लोकशाही ही एक मत एक पत मानणारी आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणात भारतीय स्वातंत्र्य आंदोलन, संविधान निर्मिती आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पासून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतच्या अनेक नेते मंडळींच्या योगदानाचा उल्लेख केला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना शिरीष देसाई यांनी श्री बिरदेव शिक्षण मंडळाच्या वतीने संविधान साक्षरता आणि संविधान जागृतीसाठी केलेल्या उपक्रमाच्या आढावा घेतला. तसेच संविधानाचे तत्वज्ञान अंगीकार केलेला माणूसच भारताला बलवान करू शकेल या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये ही जाणीव निर्माण करत असल्याचे स्पष्ट केले. मुख्याध्यापक टी.एच आकुडे यांनी अभार मानले. यावेळी संस्थेचे सचिव दादासो शिरगुप्पे, के.डी कांबळे, रमेश जाधव , सागर कांबळे, डॉ. धनाजी कांबळे, सचिन जामकर, बी.टी कांबळे, पुरंदर कांबळे, के. एन कांबळे, माने शरद पुजारी, सुधाकर पोवार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in