

नवी दिल्ली : सलग दोन महिने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतल्यानंतर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) नोव्हेंबर महिन्यात पुन्हा भारतीय शेअर बाजारात खरेदीदाराची भूमिका घेतली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या नऊ दिवसांत त्यांनी भारतीय समभागांमध्ये ५३,७३९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
जागतिक बाजारपेठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी (एआय) संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेली घसरण, देशांतर्गत कंपन्यांच्या नफ्यातील मजबूत वाढ आणि मोठ्या कंपन्यांच्या समभागांचे आकर्षक मूल्यांकन यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजाराकडे कल वाढला आहे.
डिपॉझिटरीजकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, यापूर्वी ऑक्टोबरमध्ये एफपीआयने भारतीय शेअर बाजारातून ३४,८४३ कोटी रुपये, तर सप्टेंबरमध्ये ३५,८६१ कोटी रुपये काढून घेतले होते.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की, अमेरिकेसह दक्षिण कोरिया, तैवान आणि जपानसारख्या एआय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बाजारपेठांमध्ये झालेल्या विक्रीमुळे एफपीआयच्या भूमिकेत अचानक बदल झाला आहे.
अमेरिकेतील डेटा सेंटरवरील खर्चाबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे ही विक्री झाली. अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये विजय मिळवलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाचा डेटा सेंटरवरील अनिर्बंध खर्चाला विरोध आहे. त्यामुळे एआय क्षेत्रासाठी काही नियामक बंधने आणण्याची मागणी केली जाईल, असे विजयकुमार यांनी स्पष्ट केले.
एआय क्षेत्राशी संबंधित समभागांमध्ये झालेल्या घसरणीमुळे भारत हा एआय क्षेत्रातील गुंतवणुकीशी थेट संबंधित नसलेला बाजार म्हणून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरला आहे. त्याचबरोबर भारतीय कंपन्यांच्या नफ्यातील प्रभावी वाढ आणि मोठ्या कंपन्यांच्या समभागांचे आकर्षक मूल्यांकन यामुळे भारताचे गुंतवणूक गंतव्य म्हणून महत्त्व आणखी वाढले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या नव्या गुंतवणुकीनंतर २०२६ मध्ये भारतीय समभाग बाजारातून एफपीआयने केलेली एकूण निव्वळ गुंतवणूक माघार २.४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.