ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी मूळ भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यावर २८ मतांनी आघाडी मिळवली आहे.
बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी सत्ताधारी हुजूर (काँझव्र्हेटिव्ह) पक्षाच्या इच्छुक ११ उमेदवारांमधून काही निवड फेऱ्यांनंतर संसदीय हुजूर पक्षाच्या सदस्यांनी सुनक आणि ट्रुस या दोघांचीही पक्षाचे नेतृत्वपद व पंतप्रधानपदासाठीच्या स्पर्धेतील अंतिम टप्प्यासाठी मतदानाद्वारे निवड केली. ४ ऑगस्ट ते सप्टेंबरच्या प्रारंभापर्यंत ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे सर्वसाधारण सदस्य यापैकी एकाची निवड करतील. या आठवड्याच्या सुरुवातीला ट्रुस या सुनक यांच्यावर १९ गुणांची आघाडी घेतील, असे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे. बुधवार आणि गुरुवारी ७३० पक्ष सदस्यांपैकी ६२ टक्के सदस्यांनी ट्रुस यांच्या नावाला, तर ३८ टक्के सदस्यांनी सुनक यांना पसंती दिली. ‘ब्रेक्झिट’ला अनुकूल मतदान करणाऱ्या सर्व वयोगटांतील पुरुष आणि महिला पक्षसदस्यांनी ट्रुस यांना पसंती दिली आहे; मात्र सुनक यांना संसदीय पक्षसदस्यांची सर्वाधिक पसंती आहे.