मुंबई : विदेशी गंगाजळी ५ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात ५.८९ अब्ज डॉलरने घसरून ६१७.३ अब्ज डॉलर्स झाला आहे. सलग चार आठवडे विदेशी गंगाजळीत वाढ झाल्यानंतर घसरण झाली. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर केली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या म्हणण्यानुसार या आर्थिक वर्षात आतापर्यंत ५५.७२ अब्ज डॉलर्सचा साठा वाढला आहे. २९ डिसेंबर रोजी संपलेल्या मागील आठवड्यात, साठा २.७५९ अब्ज डॉलर्सने वाढून ६२३.२ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला, जो या आर्थिक वर्षातील आतापर्यंतचा सर्वोच्च आहे. त्याआधीच्या आठवड्यात, गंगाजळी ४.४७१ अब्ज डॉलर्सने वाढून ६२०.४४१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती.
ऑक्टोबर २०२१ मध्ये, विदेशी गंगाजळी ६४५ अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती. गेल्या वर्षभरापासून जागतिक घडामोडींमुळे निर्माण झालेल्या दबावांमध्ये मध्यवर्ती बँकेने रुपयाच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्याने रिझर्व्ह बँकेला मोठा फटका बसला.
गंगाजळीचा सर्वात मोठा घटक परकीय चलन संपत्ती ४.९६ अब्ज डॉलर्सने घसरुन ५४६.६५ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरली. ५ जानेवारीला संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठाही ८३९ दशलक्ष डॉलर्सने घसरून ४७.४८ अब्ज डॉलर्स झाला आहे, तर स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDRs) ६७ दशलक्ष डॉलर्सने घसरून १८.२९ अब्ज डॉलर्स झाले आहेत, असे आरबीआयने सांगितले. आयएमएफमधील देशाची राखीव गंगाजळी देखील अहवालाच्या आठवड्यात २६ दशलक्ष डॉलर्सने घसरून ४८.६६ अब्ज डॉलर्स झाली आहे.