हरयाणात विदेशी शस्त्रे, ५ कोटींची रोकड जप्त

मनी लाँड्रिंगचे प्रकरण हरयाणा पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरमधून दिसून येते.
हरयाणात विदेशी शस्त्रे, ५ कोटींची रोकड जप्त

चंदिगड : हरयाणातील बेकायदा खाण प्रकरणाबद्दल आयएनएलडीचे माजी आमदार दिलबाग सिंग आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) घेतलेल्या झडतीमध्ये विदेशी बनावटीच्या रायफल, सुमारे ३०० काडतुसे, ५ कोटी रुपये रोकड आणि १०० हून अधिक दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी दिली.

ईडीने हरयाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा एक भाग म्हणून गुरुवारी सिंग आणि सोनिपतमधील काँग्रेस आमदार सुरेंदर पनवार यांच्यावर छापे टाकले होते. सिंग हे यमुनानगरमधील इंडियन नॅशनल लोक दलचे (आयएनएलडी) माजी आमदार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात सुमारे ५ कोटी रुपये रोख, परदेशी बनावटीच्या बेकायदेशीर रायफली, सुमारे ३०० काडतुसे आणि गोळ्या, शंभरपेक्षा अधिक दारूच्या बाटल्या, ४-५ किलो सोन्याची बिस्किटे, दागिने आणि भारत व परदेशातील मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सिंग आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित परिसर, काही ठिकाणी शोध सुरूच आहे, असे ते म्हणाले. यमुनानगर, सोनीपत, मोहाली, फरीदाबाद, चंदीगड आणि कर्नाल येथील दोन राजकारण्यांची सुमारे २० ठिकाणे आणि संबंधित संस्थांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींतर्गत छापे टाकण्यात आले होते.

हे मनी लाँड्रिंगचे प्रकरण हरयाणा पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरमधून दिसून येते. यमुनानगर आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये भाडेतत्त्वाची मुदत संपल्यानंतर आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घातलेल्या बंदीनंतरही झालेल्या कथित बेकायदेशीर खाण, खडी आणि वाळूच्या संबंधातील हे प्रकरण आहे.

एनजीटी केंद्रीय एजन्सी 'ई-रावन' योजनेतील कथित फसवणुकीची चौकशी करत आहे, 'ई-रावन' हे एक ऑनलाईन पोर्टल असून जे २०२० मध्ये हरयाणा सरकारने रॉयल्टी आणि करांचे संकलन सुलभ करण्यासाठी आणि खाण क्षेत्रातील कर चुकवेगिरी रोखण्यासाठी सुरू केले होते. दोन राजकारण्यांशी कथित संबंध असलेल्या एका सिंडिकेटद्वारे या कारवाया केल्या जात होत्या, असा दावा ईडीच्या सूत्रांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in