‘एनटीए’च्या सुधारणेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; इस्रोचे माजी अध्यक्ष समितीचे प्रमुख दोन महिन्यांत देणार अहवाल

‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराने देशात संतापाची लाट पसरली आहे. राष्ट्रीय चाचणी परीक्षांमध्ये (एनटीए) गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तत्काळ सात सदस्यांच्या उच्चस्तरीय समितीची घोषणा केली आहे.
‘एनटीए’च्या सुधारणेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; इस्रोचे माजी अध्यक्ष समितीचे प्रमुख
दोन महिन्यांत देणार अहवाल
FP Photo
Published on

नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराने देशात संतापाची लाट पसरली आहे. राष्ट्रीय चाचणी परीक्षांमध्ये (एनटीए) गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तत्काळ सात सदस्यांच्या उच्चस्तरीय समितीची घोषणा केली आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बनवली आहे. या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के राधाकृष्णन, एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, सदस्य, कुलगुरू-केंद्रीय विद्यापीठ हैदराबादचे बी. जे. राव, निवृत्त प्राध्यापक राममूर्ती (आयआयटी, मद्रास), पंकज बन्सल, सह-संस्थापक-पीपल स्‍ट्राँग, सदस्य-कर्मयोगी भारत, आदित्य मित्तल सदस्य, स्टुडंट अफेअर्स डीन-आयआयटी दिल्ली, सदस्य, सहसचिव, शिक्षण मंत्रालय, गोविंद जयस्वाल यांची नियुक्ती केली आहे.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, पारदर्शी, गैरप्रकारमुक्त व शून्य त्रुटी असलेली परीक्षा पद्धत राबवण्यात सरकार वचनबद्ध आहे. परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी पाऊल टाकण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे. डेटा सुरक्षा अधिक मजबूत करणे, राष्ट्रीय चाचणी संस्थेत सुधारणा, विद्यार्थ्यांचे हित व त्यांचे उज्ज्वल भविष्य ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता राहील, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय चाचणी संस्थेची २०१७ मध्ये स्थापना झाली होती. देशातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि शिष्यवृत्तीसाठी परीक्षेसाठी दर्जेदार चाचणी सेवा प्रदान करणे आदी त्याची उद्दिष्ट आहेत.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ‘एनटीए’च्या सुधारणेसाठी चौकशी समिती स्थापन केली होती. एनटीएची रचना, कामकाज, परीक्षा प्रक्रिया, पारदर्शकता, हस्तांतरण आणि डेटा, सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाला सूचना देईल, असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले होते.

‘एनटीए’ महासंचालक सिंह यांना हटवले

नवी दिल्ली : देशात ‘नीट’ व ‘यूजीसी नेट’ परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारामुळे देशात संतापाची लाट पसरलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय चाचणी संस्थे’चे (एनटीए) महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची हकालपट्टी केली आहे. त्यांना कार्मिक व प्रशिक्षण विभागात प्रतीक्षेवर ठेवले आहेत. त्यांच्या जागी निवृत्त आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती केली आहे. खरोला कर्नाटक तुकडीचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.

logo
marathi.freepressjournal.in