अमरावती : तिरुपती येथील मंदिरातील भक्तांना वाटल्या जाणाऱ्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळल्याने संपूर्ण देशात गदारोळ माजला आहे. हे प्रकरण आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काळात घडले, असा आरोप विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. या सर्व गदारोळाच्या पार्श्वभूमीवर रेड्डी हे तिरुपती येथील भगवान वेंकटेश्वर मंदिरात दर्शनाला जाणार होते. मात्र, याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाल्याने त्यांनी तिरुपती दौरा रद्द केला आहे. दरम्यान, रेड्डी हे परवानगीशिवाय तिरुपतीला जाऊ शकत नाहीत, अशी नोटीस पोलिसांनी बजावली. त्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला.
वाय.एस.आर. रेड्डी यांनी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराला भेट देण्यापूर्वी गैर-हिंदूंसाठी असलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करावी अशी मागणी आंध्रातील रालोआ आघाडीने केली होती. त्यामुळे रेड्डी यांनी दौरा रद्द केला असावा, असा कयास आहे.
येथे पत्रकार परिषदेत रेड्डी म्हणाले की, मी कोणत्या धर्माचा आहे हे देशाला माहीत आहे. मुख्यमंत्री बनण्यापूर्वी मी अनेकदा तिरुमला मंदिरात दर्शनाला गेलो आहे. मी बायबल वाचले असून मुस्लीम, हिंदू व शीख आदी धर्मीयांचा मी सन्मान करतो, असे ते म्हणाले.
आमच्या पक्षाच्या नेत्यांना रोखण्यासाठी तिरुपती मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचे टीव्हीवर दिसत होते. चंद्राबाबू नायडू हे पहिल्या १०० दिवसांत अपयशी ठरले आहेत. त्यामुळे नायडू यांनी लाडूचा मुद्दा उपस्थित केला. तसेच लाडूचा मुद्दा चालत नसल्याने त्यांनी आता श्रद्धा असल्याचे प्रतिज्ञापत्र मागितले आहे. लाडूच्या दर्जाच्या मुद्द्यावरून त्यांनी संशयाचे बीज जाणीवपूर्वक रोवले आहे, असे रेड्डी म्हणाले.