शीख दंगल प्रकरणी सज्जनकुमार दोषी

दिल्लीत १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगल प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
शीख दंगल प्रकरणी सज्जनकुमार दोषी
Published on

नवी दिल्ली : दिल्लीत १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगल प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. दिल्लीच्या राऊज अवेन्यू कोर्टाने हा निकाल दिला असून सज्जनकुमार यांच्या शिक्षेवर १८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. सरस्वती विहार भागात १ नोव्हेंबर १९८४ ला पिता-पुत्राची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जनकुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. सज्जनकुमार तिहार कारागृहात असून तेथूनच ते व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर राहत होते. या हत्याप्रकरणात पंजाबी बाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा तपास विशेष तपास पथकाकडे सोपविण्यात आला होता. गुन्ह्याच्या ३६ वर्षांनंतर म्हणजे २०२१ मध्ये सज्जनकुमार यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. याचा निकाल आता म्हणजेच जवळपास ४० वर्षांनी लागला आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिल्लीत प्रचंड जाळपोळ, लुटमार, मारहाण करण्यात आली होती. यावेळी हत्या झालेले जसवंत आणि त्यांचा मुलगा घरातच होते. जमावाने घरात घुसून त्यांची हत्या केली होती. तसेच त्यांचे घर जाळले होते. या प्रकरणातील सुनावणीनंतर न्यायालयाने सज्जनकुमार हे या घटनेत सहभागीच नव्हते तर त्यांनी या जमावाचे नेतृत्व केले होते, असे प्रथमदृष्ट्या मान्य करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे म्हटले आहे.

सज्जनकुमार यांचे वय आता ७९ वर्षे आहे. यामुळे न्यायालय त्यांना कोणती शिक्षा देते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. ते तीनदा खासदार राहिलेले आहेत. शीख दंगलप्रकरणी २०१८ मध्ये त्यांना दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in