
झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य, खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे आज (दि.०४) निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मागील महिन्याभरापासून त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते आणि काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
त्यांचे सुपुत्र तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ‘एक्स’वरून वडिलांच्या निधनाची बातमी दिली. “प्रिय दिशोम गुरूजी आपल्या सर्वांना सोडून गेले. आज मी सर्व काही गमावले (आज मैं शून्य हो गया हूँ)...,” असा भावनिक संदेश त्यांनी लिहिला.
राजकारणातील चार दशकांच्या कारकिर्दीत शिबू सोरेन आठ वेळा लोकसभेवर निवडून गेले तसेच दोन वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्य केले असून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होता. शिबू सोरेन यांना जूनच्या अखेरीस त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात किडनीशी संबंधित आजारामुळे दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे झारखंडमध्ये शोककळा पसरली आहे.