माजी नौदलप्रमुख रामदास यांचे निधन

ॲडमिरल रामदास यांचे पूर्ण नाव लक्ष्मीनारायण रामदास होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९३३ रोजी माटुंगा, मुंबई येथे झाला आणि त्यांचे सुरुवातीचे शिक्षण...
माजी नौदलप्रमुख रामदास यांचे निधन

हैदराबाद : माजी नौदलप्रमुख ॲडमिरल एल. रामदास यांचे शुक्रवारी हैदराबाद येथील लष्करी रुग्णालयात निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. ते वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्य समस्यांनी त्रस्त होते. ॲडमिरल रामदास यांच्या पश्चात पत्नी ललिता रामदास आणि तीन मुली असा परिवार आहे. रामदास यांना ११ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी शुक्रवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. रामदास यांच्यावर १६ मार्च रोजी हैदराबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांची मुलगी सागरी आर. रामदास यांनी सांगितले.

ॲडमिरल रामदास यांनी ३० नोव्हेंबर १९९० रोजी भारताचे १३ वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आणि १९९३ मध्ये ते निवृत्त झाले. ते निवृत्तीनंतर महाराष्ट्रातील अलिबाग येथे स्थायिक झाले होते. रामदास यांच्या देशाप्रति सेवेबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांना भाईमळा येथे जमीन भेट दिली होती. तेथे ते त्यांची पत्नी ललिता यांच्यासह सेंद्रिय शेती करत असत. सेवेत असताना त्यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या कामगिरींमध्ये कोचीनमध्ये नौदल अकादमीची स्थापना, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात आयएनएस बियास या युद्धनौकेचे नेतृत्व, तत्कालीन पश्चिम जर्मनीतील बॉन येथे १९७३ ते १९७६ भारतीय नौदल अटॅशे म्हणून सेवा करणे आदींचा समावेश आहे. नौदलाच्या पूर्व कमांडचे फ्लीट कमांडर म्हणून आणि दक्षिण आणि पूर्व दोन्ही नौदल कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. नौदल प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यकाळातच महिलांना सशस्त्र दलात सामील करून घेण्यात आले आणि त्यात नौदलाने पुढाकार घेतला.

ॲडमिरल रामदास यांचे पूर्ण नाव लक्ष्मीनारायण रामदास होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९३३ रोजी माटुंगा, मुंबई येथे झाला आणि त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली येथे प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट आणि रामजस कॉलेजमध्ये पूर्ण झाले. ते १९४९ मध्ये डेहराडूनच्या क्लेमेंट टाऊनमधील सशस्त्र सेना अकादमीच्या संयुक्त सेवा शाखेत दाखल झाले आणि सप्टेंबर १९५३ मध्ये भारतीय नौदलाचे अधिकारी म्हणून नियुक्त झाले. त्यांनी संवाद विशेषज्ञ म्हणून प्रशिक्षण घेतले होते. निवृत्तीनंतर पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी, इंडो-पाकिस्तान सोल्जर्स इनिशिएटिव्ह फॉर पीस आणि अण्वस्त्रविरोधी शांतता चळवळ आदी कार्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in