मोठी बातमी! नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान मोदींची घोषणा

चौधरी चरणसिंह हे पाचवे आणि नरसिंह राव हे देशाचे नववे पंतप्रधान होते. तर, स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक म्हटले जाते.
मोठी बातमी! नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान मोदींची घोषणा
Published on

देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरणसिंह यांच्यासह कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचं योगदान देणारे वैज्ञानिक एम.एस. स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतररत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. आज (दि.9) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली. चौधरी चरणसिंह हे पाचवे आणि नरसिंह राव हे देशाचे नववे पंतप्रधान होते. तर, स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक म्हटले जाते.

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह

"आमच्या सरकारला देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचं सौभाग्य मिळालंय. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे", असे मोदींनी म्हटले.

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव

एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव यांनी विविध पदांवर भारताची सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, तसेच अनेक वर्षे संसद व विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनविण्यात, देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी भक्कम पाया घालण्यात महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील अनेक लक्षणीय उपाययोजनांमुळे भारताला जागतिक बाजारपेठांसाठी खुले केले आणि आर्थिक विकासाच्या नवीन युगाला चालना दिली. शिवाय, भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान एक नेता म्हणून त्यांचा बहुआयामी वारसा अधोरेखित करते. त्यांनी महत्त्वपूर्ण बदलांद्वारे देशाचा सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा देखील समृद्ध केला, असे मोदी म्हणाले.

डॉ. एम. एस. स्वामीनाथन

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी भारताच्या कृषी क्षेत्राच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय काम केलं. त्यांनी आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतातील कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाच्या माध्यमातून मोठा विकास घडवून आणण्यात त्यांचं योगदान आहे. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित करण्यास मदत झाली, अशी पोस्ट मोदींनी केली आहे.

दरम्यान, यंदा एकूण 5 हस्तींना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in